काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे मनसे कार्यालयात जंगी स्वागत

0
439

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात राज्यात सभांतून चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे. मुंबईतील गुढीपाडव्याच्या सभेत राज यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. मोदीमुक्त देश करायला निघालेल्या राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करू नका असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले होते.

शिवसेना-भाजपवर सडकून टीका करणाऱ्या मनसेने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांबद्दल नरमाईची भूमिका घेतली आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी मनसे कार्यालयाच्या शाखेला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मिलिंद देवरा यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी मनसे-काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मिलिंद देवरा यांच्या प्रचार रॅलीत मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन परिसरातील जनतेला केले.

शिवाजी पार्क परिसरात संदीप देशपांडे व काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी एकत्रित मॉर्निंग वॉक करीत लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. आधी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करणाऱ्या मनसेने आता मिलिंद देवरा यांचा प्रचार केल्याने मनसेचे कार्यकर्ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली असली तरी राज ठाकरे १० ते १२ प्रचार सभा घेणार असून या सभेतून ते सेना-भाजपवर टीका करणार आहे.