मायावतींसमोर ‘या’ नेत्याला काढावे लागले बूट

0
519

लखनऊ, दि. १३ (पीसीबी) – बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती या किती कडक शिस्तीच्या आहेत. याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत आला आहे. लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा-आरएलडी या तीन पक्षाची आघाडी झाली आहे. देवबंद रॅलीत एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत व्यासपीठावर मायावती बसल्याने आरएलडीचे नेते अजित सिंह यांना पायातील बूट काढून व्यासपीठावर जावे लागले. मायावती यांच्यामुळेच अजित सिंह यांना बूट काढावे लागल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सहारनपूरमधील देवबंद येथे प्रचार सभा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मायावती आणि अखिलेश यादव बसले होते. अजित सिंह हे व्यासपीठावर चढण्याच्या तयारीत होते. तितक्यात बसपाचे कॉ-ऑर्डिनेटर यांनी अजित सिंह यांना पायातील बूट काढण्यास सांगितले. व्यासपीठीवर कुणी बूट घालून आलेले मायावती यांना चालत नाही, असे या को-ऑर्डिनेटरने अजित सिंह यांना सांगितले.

अजित सिंह यांनी २०१४ साली बागपतमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु, भाजपच्या सत्यपाल सिंह यांनी अजित सिंह यांचा पराभव केला होता. यावेळी अजित सिंह हे मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मायावती यांच्या उपस्थितीत अजित सिंह यांना दलित मते मिळतील अशी अपेक्षा त्यांना आहे. मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी हा नियम बनवला होता. कोणताही मंत्री किंवा अधिकार बूट घालून मायावती यांच्यासमोर येऊ शकत नाही. मायावती यांना धुळीची अॅलर्जी असल्याने त्यांनी हा नियम बनवल्याचे त्यांच्या निकटच्या व्यक्तीने सांगितले.