भाजपची चिंता वाढली; आणखी एक पक्ष एनडीएतून बाहेर पडणार? 

0
1408

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – भाजपवर नाराज असलेले केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह  शुक्रवारी (दि.७) होणाऱ्या मोतिहारीमधील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात   एनडीएतून बाहेर पडायचे की नाही, याबाबत निर्णय घेणार आहेत.  यामुळे ते कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.  त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास भाजपसाठी धक्का असू शकतो.

कुशवाह राष्ट्रीय लोक समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून मोदी सरकारमध्ये ते मंत्री म्हणून काम करत आहेत. दरम्यान, आगामी  लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन त्यांचे भाजपशी मतभेद झाले आहेत. कुशवाह यांनी आपल्या पक्षाला लोकसभेच्या ३ जागा सोडण्याची मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे. तर भाजप मात्र २ जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये  जागा वाटपांचा तिढा वाढला आहे. दोघेही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी  भेटीसाठी वेळ दिला नसल्यामुळे कुशावह यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपशी ते फारकत घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अधिवेशन आहे. त्यावेळी कुशावह एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.