त्या शासकीय रुग्णालयात निम्म्यापेक्षा जास्त कोरोना पेशंट्सचा मृत्यू

0
954

प्रतिनिधी,दि.२१ (पीसीबी) : कोरोना व्हायरसचा प्रकोप मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतात अत्यंत वेगाने वाढू लागला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सुमारे ६० % रुग्ण हे महाराष्ट्र, तमिळनाडू व गुजरात या तीन राज्यांमध्येच आहेत. देशात मृत्यूचा दर सरासरी ३ % असताना गुजरात मध्ये मात्र हा दर सुमारे ६ % इतका आहे. गुजरात मधील कोरोनामुळे मयत झालेल्या एकूण रुग्णांपैकी ५० % रुग्ण हे अहमदाबाद येथील सिव्हील हॉस्पिटल मधील आहेत. त्यामुळे हे सिव्हील हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी मृत्यूचे आगारच बनल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरात मध्ये कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. काल पर्यंत गुजरात मध्ये १२ हजार ५३९ कोरोना पाॅझिटीव रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सुमारे ७५ % रुग्ण एकट्या अहमदाबादमध्ये आहेत. अहमदाबाद मध्ये ९ हजार २१६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर इलाज करण्यासाठी प्रामुख्याने अहमदाबाद मधील असरवा भागातील सिव्हील हॉस्पिटल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले सरदार वल्लभ भाई पटेल (एसविपी) हॉस्पिटल चा वापर कोविड हॉस्पिटल म्हणून केला जात आहे. असरवा परिसरातील सिव्हील हॉस्पिटल मध्ये १ हजार २०० बेड्स कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

आत्तापर्यंत गुजरात मध्ये ७४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यापैकी ६०२ जणांचा मृत्यू अहमदाबादमध्ये झालेला आहे. अहमदाबाद मध्ये कोरोनामुळे मुत्युमुखी पडलेल्या ६०२ रुग्णांपैकी एकट्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये तब्बल ५८ % म्हणजेच ३५१ जणांचा मृत्यू झालेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हॉस्पिटल मधून बरे होऊन डिस्चार्ज झालेल्य रुग्णांची संख्या हि मृत्यू झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. सिव्हील हॉस्पिटल मधून आत्तापर्यंत केवळ ३३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मात्र अहमदाबाद मधील एसविपी हॉस्पिटल मध्ये परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. एसविपी हॉस्पिटल मध्ये १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तब्बल ९३५ कोरोना पेशंट बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सिव्हील हॉस्पिटल मध्ये ५० % पेक्षा जास्त मृत्यू दर असल्याने प्रशासन हबकले आहे. त्या ठिकाणी आडमीट होण्यापासून कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक घाबरू लागले आहेत.