2640 मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी इतक्या अर्जदारांनी भरली रक्कम;आकडेवारी आली समोर

0
3

दि.१४(पीसीबी)- म्हाडानं मुंबईतील विविध भागातील घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. म्हाडाकडून या लॉटरीद्वारे 2640 घरांची विक्री केली जाणार आहे. लॉटरी म्हणजेच सोडत 15 मे रोजी काढली जाणार असून यासाठी पहिल्या दोन आठवड्यात 16455 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती आहे. ही आकडेवारी 12 एप्रिल सायंकाळपर्यंतची आहे. या अर्जदारांपैकी 8529 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे.

म्हाडाच्या 2640 घरांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल आहे. तर, अनामत रक्कम आणि अर्जाचं शुल्क जमा करण्याची तारीख 30 एप्रिल आहे. अर्जदार आरटीजीएस, एनईएफटी आणि इतर माध्यमातून ऑनलाईन पेमेंट जमा करु शकतात. मुंबईत ज्यांना घर घ्यायचं आहे ते म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात.


म्हाडाकडून यावर्षी मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी सोडत काढली असली तरी यापैकी 1762 घरांचं बांधकाम सुरु आहे. म्हणजेच 2640 पैकी 66 टक्के घरांचं बांधकाम सुरु आहे. म्हाडाकडून ज्या घरांचं बांधकाम सुरु आहे, ती घरं विक्रोळी, गोरेगाव आणि बोरिवली येथील आहेत. म्हाडाच्या च्या माहितीपत्रकानुसार 1762 घरांचं बांधकाम सुरु आहे त्यापैकी 128 घरं बोरिवली पू्र्व, 85 घरं गोरेगाव पश्चिम आणि राहिलेली घरं ही कन्नमवार नगर आणि विक्रोळीतील आहेत.

म्हाडाच्या या लॉटरीतील सर्वाधिक महागडं घरं दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील असून ते उच्च उत्पन्न गटातील आहे, त्याची किंमत 6.82 कोटी रुपये आहे. तर, सर्वात कमी किंमतीचं घर मानखुर्दमध्ये आर्थिक दृष्ट्‍या दुर्बल घटकासाठीचं असू त्याची किंमत 29 लाख इतकी आहे.


मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा भागात म्हाडाची घरं उपलब्ध आहेत. ही घरं विविध उत्पन्न गटासाठी आहेत.म्हाडाची 2640 घरांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 858 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ( 1408 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 229 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत