चांडीहोमध्ये अज्ञाताने जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप; रस्त्यावरच भरवावी लागली 91 विद्यार्थ्यांची शाळा

bpcauthor
1 Min Read

मळठण (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याने सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे शाळेतील ११ विद्यार्थ्यांचा वर्ग रस्त्यावरच भरवण्याची वेळ शिक्षकांवर आली.

या घटनेनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.

शाळेत परिसरातील ११ विद्यार्थी शिक्षण घेत असून, नेहमीप्रमाणे विद्यार्थी सकाळी शाळेत दाखल झाले होते. मात्र प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात जाता आले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसून शिक्षण घ्यावे लागले.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी तसेच शाळेचे कामकाज तातडीने सुरळीत करावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

Share This Article