पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील वरुण बरणवाल यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. वडिलांच्या सायकल पंक्चरच्या छोट्याशा दुकानावर घराचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, वरुण १६ वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.
अनेकांनी त्यांना शिक्षण सोडून दुकान सांभाळण्याचा सल्ला दिला. काही काळ त्यांनी पंक्चरचे दुकानही चालवले, पण त्यांच्या आईने हार मानली नाही.
“दुकान मी चालवेन, तू फक्त अभ्यास कर,” असे सांगत तिने मुलाच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र कष्ट घेतले. घरात रोजची कमाई मर्यादित असतानाही आईने प्रत्येक रुपयाची बचत करून मुलाचे शिक्षण सुरू ठेवले.
पुढे वरुण यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून काही काळ खासगी नोकरी केली. मात्र, त्यांचे ध्येय नागरी सेवेत जाण्याचे होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
कोचिंगसाठी पैसे नसल्याने त्यांनी एका संस्थेकडे मोफत प्रशिक्षणाची विनंती केली आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होण्याचे वचन दिले. त्यांनी आपले वचन खरे ठरवत UPSC CSE 2016 मध्ये देशात ३२ वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनले.

