20 लाखांची खंडणी मागितली अन त्यातील एक लाखांची खंडणी स्वीकारली; मनसे पदाधिकाऱ्याला अटक

0
305

पुणे, दि. २२ (पीसीबी) – कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या रिजनल ऑफिसरच्या वतीने मनसे पदाधिकाऱ्याने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 20 लाखांची खंडणी मागितली. त्यातील टोकन म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह आशिष अरबाळे, पंढरीनाथ साबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वाकडेवाडी येथील रिजनल ऑफिसर डॉ. जितेंद्र संघेवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल सुभाष पाटील (वय 42, रा. लोढा बेलमांडो, गहुंजे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे चिंचवड एमआयडीसी मधील स्टार इंजिनिअर्स इंडिया प्रा ली या कंपनीत सीआयओ पदावर काम करतात. आरोपी आशिष अरबाळे हा पाटील यांच्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करतो. आशिष याने पाटील यांच्या स्टार इंजिनिअर्स इंडिया कंपनीची माहिती आरोपी पंढरीनाथ साबळे याला दिली.

पंढरीनाथ साबळे याच्या माहितीवरून मनसे पदाधिकारी कैलास नरके याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात स्टार इंजिनिअर्स इंडिआ प्रा ली या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. ही तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसर आरोपी डॉ. जितेंद्र संघेवार याच्या वतीने कैलास याने फिर्यादी पाटील यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.

त्या खंडणीतील टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पुणे-नगर रोडवर कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये हा लाच देण्याचे ठरले. दरम्यान पाटील यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी मनसे पदाधिकारी कैलास नरके याला एक लाख रुपये रकमेचे पाकीट खंडणी म्हणून घेताना पोलिसांनी पकडले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.