५६ इंच छाती असलेले सरकार आमच्या असहाय खासदाराला वाचवू शकले नाही; कारण….

0
444

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे राजकीय वर्तुळात देखील या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. “खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार बाबत माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोन वेळा पत्र लिहिले होते.पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.” असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

“डेलकर यांनी दोन पत्र लिहिली होती, त्यामध्ये त्यांनी आपली आर्त याचना, त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यांना जे वारंवार केंद्रीय अधिकारी व भाजपा नेत्यांकडून अपमानित केलं जात आहे, यासंदर्भात पूर्णपणे माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली होती. त्याचबरोबर त्यांनी भेटीची वेळ देखील मागितली होती. त्यांना स्वतः भेटून आपली आर्त कहानी सांगायची होती. परंतु त्यांना भेट देखील दिली नाही.” असा आरोप देखील सचिन सावंत यांनी पत्रकारपरिषदेत बोलतान केला आहे. तसेच, “जर आम्ही आमच्या खासदाराला वाचवू शकलो नाही, तर आम्हाला आमच्या लोकशाहीचा अभिमान वाटावा का? खासदार मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्वांचा दरवाजा ठोठवला होता. पंतप्रधान मोदींना १८ डिसेंबर २०२० आणि ३१ जानेवारी २०२१ या दिवशी पत्र मिळून देखील त्यांनी का मदत केली नाही?” असा सवाल देखील सावंत यांनी केला आहे.

“१२ फेब्रुवारी २०२१ रोजी मोहनभाईंनी त्यांना त्रास दिला जात होता म्हणून, लोकसभेच्या विशेष अधिकार समितीसमोर देखील मदतीसाठी याचना केली होती. असं देखील कानावर आलं आहे की, मोहनभाईं म्हणाले होते की, त्यांच्यासमोर राजीनामा देणं किंवा आत्महत्या करणं हे दोनच पर्याय उरलेले आहेत. लोकसभेने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी आम्ही मागणी करतो.” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. याशिवाय, “तथाकथित ५६ इंच छाती असलेले सरकार आमच्या असहाय खासदाराला वाचवू शकले नाही. कारण, मोदी सरकारच त्यांना वाचवू इच्छित नव्हते. त्यांचा छळ करणाऱ्यां सर्वांची नावं पंतप्रधान व गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आली होती. दादरा येथे आत्महत्येच्या अन्य देखील घटना घडल्या आहेत त्या सर्वांचा एकमेकांशी संबंध दिसतो.” असंही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.