२४ तासांचा प्रवास करून अमेरिकेच्या सुनबाईंचे चिखलीत मतदान

0
664

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – भोसरी, चिखली येथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अमेरिकेची सुनबाई तब्बल २४ तासांचा प्रवास करून येथे  आज (सोमवार) दाखल झाली. अपर्णा देशमुख यांनी चिखलीतील  नूतन महाविद्यालयात शिरूर मतदार संघासाठी मतदान केले. यावेळी त्यांनी बहीण अर्चना बाबर, वडील दिलीप देशमुख, आई सुरेखा देशमुख आणि भाऊ अविनाश बांदल यांच्यासह मतदान केंद्रात येऊन मतदानाचा  हक्क बजवला.

मतदानाच्या दिवशी अनेक तरुण तरुणी  मतदान न करता सुट्टीचा आनंद घेत सहलीवर जातात.  त्यामुळे ते मतदानाचा हक्क बजावण्यापासून दूर राहतात. पण त्यांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन अपर्णा यांनी मतदान केल्यानंतर केले. देशासाठी युवा नेतृत्व महत्वाचे आहे,  असेही अपर्णा म्हणाल्या.

अपर्णा देशमुख या मूळच्या  चिखली येथील असून त्यांचा विवाह अमेरिकेत (कोलंबस) येथे कार्यरत असलेल्या धनाजी यांच्याशी  झाला आहे.  धनाजी हे कमिन्स या  कंपनीत उच्च पदावर नोकरी करतात. त्यामुळे अपर्णा अमेरिकेत स्थायिक आहेत. अपर्णा यांचे मतदान  चिखली येथे आहे.  त्यासाठी  मतदान करण्यासाठी २४ तासांचा प्रवास करत अपर्णा रात्री उशिरा चिखलीत आल्या.