२०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा फाटल्यास बदलून मिळणार

0
595

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – चलनातील २०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा फाटल्यास बदलून मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाने खराब आणि फाटलेल्या नोटा बदलून देण्याबाबत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला आज (शुक्रवार) मंजुरी देण्यात आली आहे.

दोन हजार आणि दोनशे रुपयांची नोट फाटल्यास किंवा खराब झाल्यास काय करायचे? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.  बँकाही याबाबत कोणताच कायदा नसल्याने नोटा बदलून देण्यास नकार देत होत्या. मात्र, अर्थ मंत्रालयाने आता अशा नोटा बदलून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

आतापर्यंत चलनात असलेल्या १, २, ५, १०, २०, ५०, १००, ५०० आणि १००० (सध्या चलनात नाही) रुपयांच्या नोटा बदलून मिळण्याची तरतूद होती. आरबीआयच्या नोटा बदलण्यासाठी असलेल्या नियम २००९ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आरबीआयने अर्थ खात्याकडे पाठवला होता. यानुसार नवे नियम मंत्रालयाने जारी केले आहेत.

आरबीआयच्या कलम २८ नुसार नोटाबंदीपूर्वी खराब आणि फाटक्या नोटा बदलण्याची संमती होती. मात्र, नोटबंदीनंतर यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. यामुळे २०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा बदलता येत नव्हत्या. याबाबत  संशोधन करुन आरबीआयने नवा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला सादर केला होता.