११ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून; विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेसाठी वाढीव जागा

0
463

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – दहावी निकालाच्या १० दिवसांनंतर ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया  बुधवारी (दि.१९) सुरू होणार आहे. विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा  मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अकरावी प्रवेशाच्या वेळी जागा कमी पडल्याची तक्रार कायमच महाविद्यालयांकडून केली जाते. त्यावर तोडगा काढण्यासाठी विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढविण्यात येत असल्याची घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान केली आहे.

अकरावीच्या प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी नामांकित महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवता येईल का? याची चाचपणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जाईल, असे स्पष्ट करून अकरावी प्रवेशापासून राज्यातील एकही विद्यार्थी, विद्यार्थिनी वंचित राहणार नाही, असेही आशिष शेलार यांनी  यावेळी स्पष्ट केले.