ही नावं त्यांच्यासाठी जे धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होते; गृहमंत्र्यांनी जाहीर केली पालघरच्या १०१ आरोपींची नावे

0
362

मुंबई,दि.२२(पीसीबी) – ही नावं त्यांच्यासाठी जे धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होते, असं म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर प्रकरणातील १०१ आरोपींची नावे हे ट्विटरद्वारे सर्वांसमोर जाहीर केली आहे.

पालघर प्रकरणावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. तसंच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. आज सकाळी ९ वाजता गृहमंत्र्यांनी याच विषयावर विरोधकांचे कान टोचत आता पालघर प्रकरणातील अटकेत असलेल्या १०१ आरोपींची नावे जाहीर केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ही नावं त्यांच्यासाठी जी धार्मिक दंगा करण्याच्या प्रयत्नात होती, असं म्हणत अनिल देशमुख यांनी १०१ आरोपींच्या तीन याद्या ट्विट केल्या आहेत. यामध्ये एकही आरोपी हा मुस्लिम नसल्याचा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी तसं सकाळी बोलूनही दाखवलं.

दरम्यान काहीजण पालघर प्रकरणी राजकारण करत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की ताब्यात घेतलेल्या १०१ जणांपैकी एकही मुस्लिम नाहीये. त्यामुळे या प्रकरणावरून कृपया राजकारण करू नका. जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सध्या ही वेळ राजकारण करण्याची नाही, अशा शब्दात त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोधकांना खडे बोल सुनावले.