महात्मा बसवेश्वर यांनी पेरलेल्या लोकशाहीच्या बीजाचा आता झालाय वटवृक्ष – श्रीरंग बारणे

0
44
  • भारतात लोकशाहीची बीजे महात्मा बसवेश्वर महाराजांनी पेरली – बारणे
  • महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यात बारणे यांचा सहभाग

निगडी, दि. 10 मे – महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात लोकशाही मूल्यांची बीजे रोवली. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे आणि आपण सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करीत आहोत, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले.‌

पिंपरी-चिंचवड लिंगायत समाजाच्या वतीने विविध उपक्रमांनी महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. निगडी प्राधिकरण येथे बसवेश्वर महाराजांच्या भव्य पुतळ्याला खासदार बारणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी बारणे बोलत होते. कार्यक्रमास माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, गुरुराज चरंतीमठ, आण्णाराय बिरादार, एस. बी. पाटील, शिवाजी साखरे, नीलेश बारणे, चंद्रशेखर दलाल, डॉ अशोक नगरकर, दत्तात्रय बहिरवाडे, लक्ष्मण नामदे, गुरुराज कुंभार, बसवराज कनजे, खंडूशेठ बहिरवाडे, संजय दहिहांडे, सोमनाथ हुच्चे आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर यांचे निगडी प्राधिकरण येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी खासदार बारणे यांनी विशेष प्रयत्न केले होते. खासदार बारणे यांच्या प्रयत्नांतूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याच्या अनावरण झाले होते.

खासदार बारणे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. धर्म व्यवस्था व जातीव्यवस्थेतील अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र बसून अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी बाराव्या शतकात लोकशाही संसदेची कल्पना प्रत्यक्षात आणली. या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर, अडीअडचणींवर चर्चा करून निर्णय घेण्याचा विचार रुजवला. त्यांनी रोवलेल्या लोकशाही बीजांमुळेच आता आपण लोकशाहीची मधुर फळे चाखत आहोत.

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त पिंपरी- चिंचवड लिंगायत समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आले होते. बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूकही काढण्यात आली.