हाथरसच्या पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे! मेधा पाटकर व साथींनी हाथरसच्या पीडितेच्या कुटुंबियांकडे व्यक्त केली सहवेदना

0
236

हाथरस, दि. १२ (पीसीबी) “लिंग आणि जातीय विषमता अजूनही आपल्या समाजात खच्चून भरली आहे, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हाथरसची सामुहिक बलात्काराची घटना आहे. त्यावर समाजाचे दोन भाग होणे आणि सरकारनेही त्या घटनेतील उच्चवर्णीय आरोपींची बाजू घेऊन कारवाईत केलेला विलंब निषेधार्ह आहे” ,असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केले.

उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील भूलगर्ही येथे सप्टेंबर २०२० मध्ये ज्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला तिच्या कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन मेधाताई आणि सहकाऱ्यांनी नुकतीच घेतली भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उत्तर प्रदेशाच्या हाथरस जिल्ह्यातील भूलगर्ही येथे हे पीडित कुटुंब राहते त्या गावाला पोलीस छावणीचे रूप आले आहे. त्या सर्व बंदोबस्तामधून कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन घडलेली घटना, त्यानंतर समाजातील आरोपी आणि जातीयवादी, दहशतवादी, भ्रष्ट योगी सरकार यांचेकडून कुटुंबावर येत असलेला दबाव या कार्यकर्त्यांनी समजावून घेतला. तुमच्यासोबत आम्ही आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी त्या पीडित कुटुंबाला दिला. अद्याप मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट तिच्या कुटुंबाला का मिळालेला नाही? तिला उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या दवाखान्यात न नेता सफदरजंग हॉस्पिटल मध्ये का नेले गेले? पोलिसांनी कुटुंबाच्या ताब्यात मुलीचे प्रेत न देता ते रात्रीतून अग्निसंस्कार करुन नष्ट का केले? प्रत्येक बलात्काराच्या केस नंतर कायम मुलींचे बलात्कारी व्यक्तीबरोबर संबंध होते याच्या खोट्या गोष्टी का सांगितल्या जातात? – असे प्रश्न स्थानिक सरकार आणि समाजाच्या पुढे त्यांनी उभे केले.

निवडणुकीच्या जाहीरनाम्यांतून देशाला जगात महाशक्ती बनवण्याचे दावे करत सत्तेवर आलेले सरकार अजूनही मुलींच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था करू शकलेले नाही. केंद्र सरकारच्या अचानक लॉक डाऊनला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला पण सरकार मात्र अजूनही लोकांच्या रोजगार आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या धोरणांची व्यवस्था घेऊन लोकांसमोर येत नाही. त्यामुळेच महामारीच्या या पार्श्वभूमीवर देशातील गरीब जनतेला जिवंत राहण्यासाठी मजुरीला जावे लागते. ह्या सर्व शोषित, अडचणींच्या परिस्थितीचा गैरफायदा जस सरकार गरीब, शेतकरी, कामगारांच्या विरुद्ध कायदे मंजूर करून घेत आहेत तर समाजातील जात, धर्म आणि धनदांडगे असलेले लोक मुलींवर बलात्कार करून, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करून, त्यांचा खून करून घेत आहेत. त्यामुळेच एकूणच समाजातील मोठा समूह हा अधिक असुरक्षित, शोषित बनला आहे आणि या सर्व कारणांमुळे मुलींवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.

ह्या परिस्थितीचा निषेध समाजात मोठ्या प्रमाणात केला जात आहे हे वास्तव पीडित कुटुंबाला कळावे, ह्या घटनेतील मुलीवर सामुहिक बलात्कार झालेला असून त्याचे पुरावे उपलब्ध आहेत तेव्हा पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी आम्हीही प्रयत्नशील राहू हा विश्वास देण्यासाठी आणि समाजातील लोकांचा त्यांना असलेला पाठिंबा त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी ही समिती हाथरस येथे गेली होती.

या समितीत मेधा पाटकर, एनएपीएम आणि सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. संदीप पांडे, एनएपीएम आणि खुदाई खिदमतगारचे फैसल खान, गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या माजी अध्यक्षा डॉ. मणिमाला, सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅड. हाशमी, दिल्ली सॉलिडॅरिटी ग्रुपचे अमित कुमार आणि ज्यो अथिआली यांचाही सहभाग होता.

देशभर ह्या घटनेने समाज ढवळून निघाला आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यात जातीच्या उतरंडीचा घेतला जाणारा गैरफायदा याविरुद्ध देशभर चळवळ अधिक सक्रिय करण्याची घोषणा मेधाताई यांनी केली. २७ सप्टेंबर पासून एनएपीएम च्या वतीने देशभर ‘हम तो बोलेंगे’ हे अभियान सुरु झाले आहे. जागतिक मानवी हक्क दिन १० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या ह्या अभियानात देशभर ‘लिंग आणि जातीय विषमता’ याविरुद्ध जन जागृती केली जाईल आणि ‘हम तो बोलेंगे’चा नारा अधिक बुलंद करण्यात येईल. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मेधा पाटकर यांनी या भेटीच्या निमित्ताने केले आहे.