हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठिंबा

0
1051

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  कन्नड मतदारसंघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनी शिवसेना उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली. कन्नडचे माजी आमदार आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात उदयसिंह राजपूत अशी लढत होईल, असे चित्र होते, मात्र, किशोर पवार यांच्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. त्यातच आता हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं आता हर्षवर्धन जाधव यांचं पारडं जड झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमनं पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. एमआयएमच्या पाठिंब्यामुळं त्यांचं पारड जड झाल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

शुक्रवारी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली होती, त्यांनंतर त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपाकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडं घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली होती.

एका प्रचार सभेत बोलत असताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, “हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचं भाषण आहे. दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडं. आमचा उमेदवार असं करतो, तसं करतो हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केलं हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रफिक पोलिसला फोन करू शकतो की नाही, हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. आहो तुम्ही येडे झाले का, त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले. हे शिवसेनेच भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना विचारतो. एव्हढंच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडं आहे, तर सत्तार तुमचा कोण लागतो? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे, चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है…,” अशी पातळी सोडत हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.