हरियाणातील भाजप सरकारचा पाहुणचार सोडून परत या – सचिन पायलट यांना काँग्रेसचे आवाहन

0
402

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर पक्षापासून दूर गेलेल्या सचिन पायलट यांना काँग्रेसनं पुन्हा एकदा परत येण्याची विनंती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. सुरजेवाला म्हणाले की, “आमचे युवा सहकारी सचिन पायलट यांची भूमिका आम्ही माध्यमांतून ऐकली आहे. त्यांना भाजपात जायचं नाही. जर त्यांची ही भूमिका असेल आणि त्यांना काँग्रेसमध्ये परत यायचं असेल, तर त्यांनी हरयाणातील भाजपा सरकारकडून केलं जाणारं आदरातिथ्य सोडून तातडीनं जयपूरला परतावं,” असं आवाहन काँग्रेसनं सचिन पायलट यांना केलं आहे.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “आमचे युवा सहकारी सचिन पायलट व इतर आमदारांना काँग्रेसनं आग्रह केला आणि विचारलं की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत काही मतभेद असतील तर पक्षासमोर मांडावं. काँग्रेस पक्ष तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी तयार आहे. अनेक वेळा त्यांना पक्षानं परत येण्याची विनंती केली. सचिन पायलट व इतर आमदारांना अनेकवेळा निमंत्रण दिलं गेलं व बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे त्यांना असंही सांगण्यात आलं होतं, की काँग्रेसमध्ये बहुमत तुमच्या बाजूनं आहे, तर ते सिद्ध करण्यासही सांगितलं होतं. काँग्रेसची एक नव्हे तर दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. त्यांनी यावं व त्यांच म्हणणं मांडावं यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली होती,” अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

“सचिन पायलट यांना पक्षानं त्यांच्या युवा काळात पक्षानं अनेक पदांवर संधी देत पुढे आणलं. खासदार, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदी पदे देऊन १४ वर्षाच्या काळात त्यांना पुढे आणण्यात आलं. अशा पद्धतीनं कोणत्याही नेत्याला पुढे नेलं नसेल. पाच दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी त्यांच्या परतीचे दरवाजे खुले ठेवले. काँग्रेस नेतृत्त्वानं एकापेक्षा अधिक वेळा संपर्क केला. त्याचबरोबर समिती सदस्यांनीही त्यांना विनंती केली होती. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची विनंती केली. तसेच काँग्रेसवर निष्ठा आहे, तर ज्या हॉटेलमध्ये आहात, तिथून बाहेर पडून, माध्यमांना सांगावं की आपली निष्ठा काँग्रेससोबत असल्याचं जाहीर करावं. मात्र, तसं काहीच न केल्यानं जड अंतकरणानं आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागली,” असं सुरजेवाला यांनी सांगितलं.

“आज माध्यमातून आम्ही सचिन पायलट यांचं म्हणणं ऐकलं आहे. ते भाजपात जाऊ इच्छित नाही. जाणार नाही. आम्ही सचिन पायलट व त्यांच्यासोबतच्या आमदारांना सांगणं आहे की, जर तुम्हाला भाजपात जायचं नाही. तर मग भाजपाच्या हरयाणातील सरकारकडून होत असलेलं आदरातिथ्य तातडीनं सोडा. जर तुम्ही भाजपात जाऊ इच्छित नाही, तर मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारचं सुरक्षा चक्र तोडून बाहेर यावं. जर भाजपात जायचं नाही, तर हे दोन हॉटेल भाजपाचा अड्डा बनला आहे, तिथून मुक्त व्हावं. भाजपा नेत्यांसोबत चर्चा बंद करावी आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपल्या जयपूरमधील घरी परतावं. मार्ग चुकलेल्या प्रत्येक काँग्रेस आमदाराला माझा सल्ला आहे, कुटुंबातील सदस्याला येण्याापासून रोखायला नको. परत यावं व पक्षासमोर बाजू मांडावी,” असं आवाहनं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.

आमदार फोडाफोडीसाठी २० कोटींचा भाव – अशोक गेहलोत
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माध्यमांशी बोलताना, दिल्लीत भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार केला जात असून २०-२० कोटींना आमदारांना खरेदी केलं जातं असल्याचा आरोप केला आहे. जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत, असा दावाही अशोक गेहलोत यांनी केला असून आमचे सहकारी भाजपच्या जाळ्यात अडकले असल्याचं म्हटलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला गेला होता असं सांगताना आमच्या बहुमत असल्याचं अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत. आम्हाला १० दिवसांसाठी आमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. अन्यथा मनेसर येथे जे झालं तेच येथेही होताना दिसलं होतं,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. “मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. नव्या पिढीवर आमचंही प्रेम आहे. शेवटी भविष्य त्यांचंच आहे. नवीन पिढी केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष पद भूषवत आहे. आमच्यावेळी आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता तो यांनी केला असता तर कळलं असतं,” असंही ते म्हणाले आहेत.

“उत्तम इंग्लिश बोलणे, प्रसारमाध्यमांना चांगले बाइट देणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसतं. देशासाठी तुमच्या मनात काय आहे, तुमची विचारसरणी, धोरणं आणि कटिबद्धता…प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.