हनी ट्रॅप, व्याभिचारात पिंपरी चिंचवडसुध्दा आघाडीवर – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
574

राज्याचे समाजिक न्याय आणि विधी मंत्री धनंजय मुंडे यांचे गलबत वादळात सापडले. धर्मपत्नी असताना त्यांनी करुना शर्मा या दुसऱ्या महिलेशी सहमतीने (लीव्ह इन) संबंध ठेवले. तिच्यापासून दोन मुले आहेत, असे स्वतः मुंडे यांनी प्रथमच जाहीर केले. आता कहर म्हणजे करुनाची धाकटी बहिण रेणू शर्मा हिने मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केला, संबंधाची क्लिप तयार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. मुंडे यांनी हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे स्पष्टीकरण दिले. नंतर मुंडे यांच्याप्रमाणे भाजपा, मनसे आणि जेट एअरवे चे अधिकारी अशा तिघांनी रेणू शर्मा आपल्याला जाळ्यात ओढत होती (हनी ट्रॅप) असे उघड केले. या गदारोळात आता आघाडी सरकार विरोधात भाजपा महिला आघाडी सोमवारी (१८जानेवारी) राज्याव्यापी आंदोलन करणार आहे. खरे तर, मूळ प्रकरण हे रेणू शर्मा यांनी जीवाच्या आकांताने केलेल्या गंभीर आरोपांचे आहे. मुंडे `हनी ट्रॅप` मध्ये फसले की, त्यांना फसवले अथवा हे ब्लॅकमेलिंगच आहे ते आता तपासातून समोर येईल. या निमित्ताने `हनी ट्रॅप`मध्ये आजवर कोण, कुठे, कसे अडकले तसेच खासगी (वैयक्तीक) आयुष्य, सार्वजनिक आयुष्य यावर मंथन सुरू झाले. देशभरातील आणि स्थानिक पातळीवरची वानगीदाखल काही उदाहरणे पाहिली. अपवाद वगळता एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. सबघोडे बारा टक्के आहेत. प्रामुख्याने भाजपाने तर नैतिकतेचा टेंभा मिरवू नये आणि नाक वर करून बोलूही नये. हमाम मे सब नंगे असे चित्र आहे. न्यायपालिकेत न्याय मिळेल तेव्हा मिळेल, पण तुर्तास जनतेने अशा चारित्रहिन नेत्यांना खड्यासारखे बाजुला केले पाहिजे. निर्लज्जपणा आणि खोटेपणाचा कळस करायचा आणि वर आणायचा हं धंदे बस्स करा.

राजकारण, पद, मोठ्या कंत्राटांसाठी हनी ट्रॅप –
नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचा प्रयत्न असल्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. विदर्भातील राजकारण त्यात ढवळून निघाले होते. मध्य प्रदेशात लोकसभा निवडणुकित एका हाय प्रोफाईल हनी ट्रॅपची चर्चा होती. काही खासदार-आमदार यांच्या संपर्कातील तरुणींचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियात पसरले. धक्कादायक बाब म्हणजे त्या क्लिपसाठी ३० कोटींचा व्यवहार झाला, असे छापून आले. मोठी कंत्राटे, खंडणी वसुलीसाठी हनी ट्रॅपचा वापर केल्याचे तपासात समोर आले. वर्षापूर्वी इंदोर शहरात मोठे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या ४ महिलांना अटक करण्यात आली. भाजपा आणि आरएसएस चे अनेक नेते त्यांत गुंतल्याचा आरोप काँग्रेस नते मानक आग्रवाल यांनी केली होता. हे देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलिंग स्कॅंडल होते. तब्बल ४,००० क्लिपस् तयार होत्या. श्वेता जैन ही महिला त्याची सुत्रधार होती. ८ मंत्रीही त्यात अडकले होते. महाराष्ट्राच्या मंत्रालयात फेरफटका मारला तर दिसेल की, दलाल मंडळी कितीतरी निर्णय हे हनी ट्रॅपच्या माध्यमातून स्वतःसारखे करून घेतात. महाराष्ट्राच्या राजकारणातही असे जुन-नवे अनेक किस्से आहेत. काही छंदीफंदी नेते आणि त्यांनी वापरलेले हनी ट्रॅपचे दाखले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांना त्यात नवीन काहीच नाही. विदेशातील नमुने माहिती आहेत. पाकिस्तानने आयएसआय चा एजंट नेमण्यासाठी हनी ट्रॅप लावल्याचे एक प्रकरण नाशिकला नुकतेच उघडकीस आले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्फ हे बाहेरख्याली होते, म्हणून त्यांच्यावर महाभियोग चालला.. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रन्स्वा ओला यांना विवाह न करता अनैतिक संबंधातून चार मुले होती, अशी चर्चा निवडणुकात गाजली आणि त्यांची राजकीय कोंडी झाली.

पिंपरी चिंचवडला व्याभिचारी व हनी ट्रॅपसुध्दा –
पिंपरी चिंचवड शहरील अनेक रथीमहारथी राजकारणी, अधिकारी, कंत्राटदार, दलालसुध्दा हनी ट्रॅपचे बळी आहेत. जमिनीचा पैसा ज्यांच्या खिशात खुळखुळतो असे काही आजी-माजी नगरसेवक त्यात अडकलेत. सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई चे दौरे करणाऱ्यांच्या काही व्हिडीओ क्लिपस्, फोटो नेत्यांच्या दप्तरी आहेत. महापालिकेचे ठेके मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांबाबत हनी ट्रॅप झालेत. शिक्षण मंडळाच्या कंत्राटासाठी एका वादग्रस्त ठेकेदाराने मंडळाच्या काही अधिकाऱी-पदाधिकाऱ्यांची गोवा सहल घडवून त्यात नको ते सर्व रेकॉर्ड केले आणि काम मिळविले होते.समाजसेवेचा बुरखा पांघरून, संस्था, संघटनांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या लग्नाची गावभर चर्चा होते. पिंपरी चिंचवडला हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या नेत्यांनी तीन-तीन कुटुंब सांभाळली आणि राजकारण केले. तीन वर्षापुर्वी केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर त्यांच्याच सहकारी महिला रिपोर्टरने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यावरून देशभर मीटू चळवळ उभी राहिली होती. ते लोन जर का पिंपरी चिंचवडच्या दिशेने आलेच तर आपली पळता भुई थोडी होईल या भितीने राज्यातील एका बड्या नेत्याला कापरे भरले होते. गेल्या लोकसभा निवडणुकित पार्थ पवार यांच्या विरोधकांनीसुध्दा अत्यंत आक्षेपार्ह असे पबमधील फोटो व्हायरल केले होते. त्याचा फटका त्यांना बसला. भानगडीत अडकलेल्या राजकीय कार्कर्त्यांची कुठे कमी कुठे जास्त संख्या असे गणित मांडले तर तेसुध्दा भाजपालाच जड जाईल. हनी ट्रॅप मुळे गेल्या ४०-५० वर्षांत किती संसार उध्वस्त झाले याचेही अनेक दाखले देता येतील. अनेकदा पदासाठी स्त्रीयांना आपल्या वासनेची शिकार करणारे व्यभिचारी पुरूष हासुध्दा हनी ट्रॅपपेक्षा आणखी मोठा विषय या शहरात चर्चेत आहे. आता त्यात तोंड काळे करायचे, सापळ्यात अडकायचे की स्वतःचा बचाव करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे. राजकारणात कितीतरी सज्जन, खानदानी, चांगल्या महिला भगिनी आहेत, त्यांनाही या सगळ्याचा खूप त्रास होतो. इथेही किमान ५०-६० धनंजय मुंडे आणि १०-१५ रेणू शर्मा आहेत. झाकली मूठ उघडली तर गहजब होईल.