‘रिर्व्हर सायक्लोथॉन’मध्ये ८ हजार ७९० सायकलपटूंचा सहभाग

0
517

– इंद्रायणी नदी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

– शहीद जवान संभाजी राळे कुटुंबियांचीही उपस्थिती

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आयोजित केलेल्या ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये रविवारी तब्बल ८ हजार ७९० सायकलपटूंनी सहभाग घेतला. सर्वाधिक सायकलपटू सहभागी होण्याचा विक्रम आज पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी नोंदवला आहे.

शिवपूत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१’ चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार महेश लांडगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, स्थानिक नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ अंतर्गत १० किमी व २५ किमी अशी रॅली घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. अस्मी लोंढे यांनी गणेश वंदना करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर राज्याभिषेक दिनानिमित्त शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.

सायकलिस्ट सहभागी झाले व प्रत्येक सायकलस्वारास टी शर्ट , मेडल, अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले व संतोष गाढवे यांनी केले. तसेच, आभार सचिन लांडगे यांनी मानले.

शहीद संभाजी राळे यांना श्रद्धांजली…
देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेले जवान कैलासवासी संभाजी ज्ञानेश्वर राळे यांचे कुटुंबियांनीही ‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ला उपस्थिती दर्शवली. अरुणा ज्ञानेश्वर राळे (आई), ज्ञानेश्वर जयवंत राळे (वडील), अमृता नामदेव गारगोटे(बहिण) यांचे स्वागत दत्ताभाऊ कंद यांनी केले. तसेच, रॅलीत सहभागी सायकलस्वारांकडून शहीद संभाजी राळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कर्नल टी. एस. धामी यांनी शहीद राळे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सायकलपटूंना मार्गदर्शनही केले. अविरत श्रमदान संस्थेच्या माध्यमातून शहीद जवान संभाजी राळे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाची मदतही करण्यात आली.सायकलपटूंचा सन्मान…
पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड यांच्यातर्फे सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना व दैनंदिन कामासाठी रोज सायकलींग करणाऱ्या सायकलिस्टना स्टील बॉटल वाटप करण्यात आले. तसेच, प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला. मोशी सायकलिस्ट ग्रुपचे कै. निलेश शिलवणे यांचे सायकल चालवताना निधन झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ सायकलींगमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या देशभरात सायकल वारी करणाऱ्या सायकलिस्टचा सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी तर्फे एक गरजू सायकलिस्टला एक सायकल भेट देण्यात आले.