हडपसर येथील रिक्षाचालकाच्या खूनातील फरार आरोपीस भोसरीतून अटक

0
2348

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – हडपसर येथील रिक्षाचालकाला गणपती बगण्यासाठी नेऊन चौघाजणांनी मिळून त्याचा खून करुन मृतदेह मांजरी परिसरात फेकून दिला होता. ही घटना बुधवार (दि.१९ सप्टेंबर) मांजरी येथे घडली होती.

अकबर शेख (रा. मांजरी, हडपसर) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती. मात्र आरोपी राम गंगाधर लोंढे (वय २५, रा. येरुळ, ता. आनंतपाळ जि. लातुर) हा फरार होता. त्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-१ चे पथकाने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.१९ सप्टेंबर) रोजी मांजरी येथील रिक्षाचालक अकबर याला गणपती पाहण्यासाठी चौघा आरोपींनी नेले होते. यावेळी आरोपींनी अकबरच्या रिक्षातच दारु पिली आणि गणपती पाहिले. मात्र अकबरला घरी जाण्यास उशीर होत असल्याने त्याने आरोपींना रिक्षाचे झालेले भांडे मागून खाली उतरण्यास सांगितले. यामुळे चौघा आरोपींनी मिळून अकबर याला जबर मारहाण करुन त्याचा खून केला आणि मृतदेह मांजरी येथे नेऊल टाकला तर रिक्षा शिवाजीनगर येथे नेली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक केली. मात्र आरोपी राम लोंढे हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता.

शनिवारी (दि.२७) पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ चे पथक भोसरी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई गणेश सावंत यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, मांजरी येथील रिक्षाचालकाच्या खूनातील आरोपी इंद्रायणीनगर भोसरी येथील नवीन भाजी मंडईजवळील मोकळ्या जागेत मित्राची वाट पाहत उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून राम लोंढे याला अटक केली आणि हडपसर पोलिसांच्या हवाली केले. हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, हवालदार राजु केदारी, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, आशिष बोटके यांच्या पथकाने केली.