मनुस्मृतीला विरोध थांबवा, अन्यथा तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु ; छगन भुजबळांना धमकीचे पत्र  

0
835

नाशिक , दि. २८ (पीसीबी) – मनुस्मृतीला विरोध  करणे थांबवा, अन्यथा  ठार मारू, अशी धमकी  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देण्यात आली आहे.  याबाबतचे पत्र  भुजबळांना पाठवण्यात आल्यामुळे     राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, असा  मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे.  नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ या पत्यावर धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. हे पत्र निनावी  आहे. नेमके कुणी हे पत्र पाठवले, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, नाशिकमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. तसेच  यासंदर्भात तक्रार नोंदवणार असल्याचे सांगितले जात आहे. भुजबळ फार्मवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्तांनी मोठी गर्दी केली आहे.  या धमकीमागे कोण आहे? याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी कार्यकर्तांनी केली आहे.

आम्हाला मनुस्मृती नको आहे. तर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हवे आहे, असे भुजबळ यांनी  नागपुरात म्हटले होते. त्याचबरोबर भुजबळांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध नोंदवला आहे.