स्पाइन रस्त्याने बाधित त्रिवेणीनगरमधील ७८ नागरिकांना प्राधिकरणाकडून भूखंडाचे वाटप

0
1283

भोसरी, दि. २७ (पीसीबी) –  स्पाइन रस्त्यामुळे बाधित झालेल्या झालेल्या तळवडे, त्रिवेणीनगर येथील ७८ नागरिकांना प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ११ मधील प्रत्येकी १२५० चौरस फुटाची जागा  सोडतीद्वारे सोमवारी (दि. २७) वाटप करण्यात आली.

कृष्णानगर येथील क्रीडा संकुलात सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी प्राधिकरणाने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक ते नाशिक महामार्गापर्यंत स्पाइन रस्ता तयार केला आहे. या रस्त्यांमुळे त्रिवेणीनगर येथील ७८ नागरिकांच्या मिळकती बाधित झाल्या आहेत. बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित होता. या नागरिकांनी न्यायालायातही धाव घेतली होती.

अखेर प्राधिकरणाने बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सेक्टर क्रमांक दोन मध्ये प्रत्येक बाधिताला एक हजार चौरस फुटापर्यंतची जागा देण्याची तयारी केली. परंतु, आमदार महेश लांडगे यांनी बाधितांना कमी जागा देण्यास विरोध करत प्रत्येकाला १२५० चौरस फूट जागा देण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार प्राधिकरणाने सेक्टर क्रमांक ११ मध्ये प्रत्येक बाधिताला १२५० चौरस फूट जागा देण्याचे अंतिम केले.

सोमवारी (दि. २७) बाधित ७८ नागरिकांसाठी सोडतीद्वारे सेक्टर क्रमांक ११ मधील जागा निश्चित करण्यात आली. येत्या दोन ते तीन महिन्यांत या भूखंडांचा ताबा संबंधित बाधितांना देण्यात येणार असल्याचे प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले. उर्वरित बाधितांनाही लवकरच भूखंड वाटप केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.