‘स्थायी समितीचा राजीनामा घ्यावा’: राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

0
219

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांना व स्थायी समिती कार्यालयातील चार कर्मचा-यांना मागील महिण्यात एससीबीने भ्रष्टाचार करताना रंगेहाथ पकडून अटक केली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावलौकिकास धक्का बसला आहे. या भ्रष्टाचारी पदाधिका-यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने महापौर माई ढोरे यांच्याकडे करण्यात आली. महापौर माई ढोरे यांना दिलेल्या पत्रकार विशाल वाकडकर म्हणतात, लोकनेते शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मनपाचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. यामध्ये शहरातील सर्व घटकांचे योगदान आहे. परंतू मनपामध्ये जेंव्हापासून भाजपाची सत्ता आली आहे. तेंव्हापासून पिंपरी चिंचवड मनपाचे नाव चांगल्या क्षेत्रात येण्याऐवजी भ्रष्टाचारातच गाजत आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्या सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनावणे, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर, संतोष वाघेरे, प्रसाद कोलते, चेतन फेंगसे, अक्षय माछरे, प्रतीक साळुंखे, अफ्रिद शिकलगार आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपा देशपातळीवर स्वच्छ महापालिका, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असणारी महापालिका असा नावलौकिक असणा-या या आपल्या शहराची ओळख भ्रष्टाचारी महानगरपालिका म्हणून 2017 पासून गाजत आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, 24X7 पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी कंपनी, टेक महिंद्रा कंपनी, एल ॲण्ड टी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, महिला प्रशिक्षण शिबीर, शिक्षण मंडळातील घोटाळा, स्थापस्थ, विद्युत विभागातील भ्रष्टाचारांची प्रकरणे गाजत असताना माणूसकीला काळीमा फासणा-या काही घटना कोरोना कोविड काळात घडल्या आहेत. या घटनांचे तुम्ही साक्षीदार आहात, कोरोना कोविड काळात रुग्णांना देण्यात येणा-या सेवा, सुविधांमधिल भ्रष्टाचार त्यांच्या बिलांमधिल गैरव्यवहार अजूनही सुरु आहे.

भाजपाच्या या भ्रष्टाचारी राजवटीमुळे शहरातील सुजाण नागरीकांची मान शरमेने खाली जात आहे.