तरुणाला सिमेंट गट्टू, कोयत्याने मारहाण

0
370

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – तीन ते चार अनोळखी इसमांनी एका तरुणाला सिमेंटच्या गट्टूने आणि कोयत्याने मारले. यामध्ये तरुणाच्या कमरेवर, बरगडीवर तसेच चेह-यावर दुखापत झाली. ही घटना सोमवारी (दि. 6) मध्यरात्री पावणे एक वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

राजाराम अनिल भोसले (वय 25, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांचे वल्लभनगर बस स्टॅन्ड येथे काही जणांसोबत भांडण झाले. त्यानंतर फिर्यादी नेहरूनगर येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलसमोर थांबले असताना कार मधून तीन ते चार अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टूने चेह-यावर, पाठीवर मारले. उलट्या कोयत्याने कमरेवर, बरगडीवर मारून चेह-याचे हाड फ्रॅक्चर केले. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करून आरोपी निघून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.