सोलापूर येथील सहाय्यक फौजदारांचा कोरोनामुळे मृत्यू

0
455

सोलापूर, दि. ७ (पीसीबी) : लॉकडाऊन १ काळात सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नव्हता, परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी अचानकपणे सोलापूर मधील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. आज सोलापूर मधील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार ताजुद्दीन रहमान शेख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात पोलीस दलातील ५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

सोलापुरात कोरोनाचे संकट सातत्याने वाढत असल्यामुळे सोलापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे. प्रशासनही अस्वस्थ झाले आहे. १२ एप्रिल रोजी सोलापुरात तेलंगी पाच्छा पेठेत कोरोना पाॅझिटीव्ह असलेला पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक रुग्णांची संख्या वाढतच आहे.

एकमेकांच्या थेट संपर्कातून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पाच्छा पेठेसह शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरानगर, बापूजीनगर, लष्कर, मोदीखाना, नई जिंदगी चौक आदी बहुतांशी दाट लोकवस्तीचा आणि झोपडपट्टय़ांचा परिसर कोरोनाग्रस्त झाला आहे. कालपर्यंत सोलापुरातील कोरोना पाॅझिटीव रुग्णांची संख्या रुग्णसंख्या १५३ वर पोहोचली असताना त्यात १० मृतांचाही समावेश होता.

मागील आठवड्यात सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार ताजुद्दीन रहमान शेख यांना ड्युटीवर असताना त्यांना ताप व कणकण वाटू लागली. सहाय्यक फौजदार यांनी तीन दिवस रजा घेऊन घरी आराम करण्याचा प्रयत्न केला. परंतु तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना सोलापूर सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. टेस्टच्या अहवालानुसार त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अवघ्या चार महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचा कोरोना विरुद्ध लढताना दुःखद मृत्यू झाला. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत”.