पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योग सुरू करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस आयुक्तांना आदेश

0
1116

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – शहरातील लघुउद्योग सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा, असे स्पष्ठ आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना आज सकाळी दिले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेले ४५ दिवसांपासून शहरातील कारखानदारी बंद आहे. टाटा मोटर्स, बजाजसह बहुसंख्य मोठ्या कारखान्यांना सुटे भाग पुरविणारे सुमारे ११ हजार लघुउद्योग शहरात कार्यरत आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लाखो कामगार गावी गेले. पुरवठा बंद असल्याने आवक बंद झाली. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या किराणा, दूध, भाजी, मेडिकलची दुकाने दुपारी दोन पर्यंत सुरू असतात. त्याशिवाय कन्टेमेंट झोन वगळून मद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. चाकण, तळेगाव, रांजणगाव या परिसरातील कारखाने बुधवार (दि.६) पासून सुरू करण्यात आले.

त्यामुळे आता रेडझोन वगळून पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योगांनाही परवानगी द्यावी अशी मागणी आहे.
लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी त्याबाबत आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी पीसीबी प्रतिनिधीला दिली. ते म्हणाले, शहरातील सर्व लघुउद्योजकांच्या व्यथा मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कथन केल्या. चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखानदारी सुरू झाली आहे. आजवरच्या बंद मुळे एकतर संपूर्ण धंदा ठप्प आहे. अर्धे अधिक कामगार गावाकडे निघून गेले. आता जे शिल्लक आहेत त्यांना हाताला काम मिळाले नाही तर तेसुध्दा रोजगाराच्या शोधात चाकण, तळेगावला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मोठ्या कंपन्यांनी ज्या ऑर्डर दिल्या आहेत त्याची वेळेत पुर्तता झाली नाही तर परिस्थिती कठीण होईल. सर्व ऐकूण घेतल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री पवार यांनी फोन करून महापालिका आणि पोलीस आयुक्त यांना रेडझोन वगळून कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, होय आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. काय रिलीफ देता येईल या दृष्टीने विचार सुरू आहे, मात्र शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. एकूण परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा लागेल, असे सांगितले.