सैफर्ट पुन्हा चमकला, न्यूझीलंडचा मालिका विजय

0
226

हॅमिल्टन, दि.२० (पीसीबी) – सलामीचा आक्रमक शैलीचा फलंदाज टिम सैफर्टच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीने न्यूझीलंडने दुसऱ्या टी २० सामन्यात पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयाने त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सैफर्टच्या खेळीने पाकिस्तानच्या महंमद हफिजची नाबाद ९९ धावांची खेळी व्यर्थ ठरली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ६ बाद १६३ धावा केल्या. न्यूझीलंडने हे आव्हान चार चेंडू शिल्लक राखूनच गाठले. त्यांनी १९.२ चेंडूंत १ बाद १६४ धावा केल्या. पितृ्त्वाच्या रजेतून परतलेल्या केन विल्यम्सनने नाबाद ५७ धावा करताना विजयी धाव घेतली.

आव्हानाचा पाठलाग करताना सैफर्ट पुन्हा एकदा टी २० क्रिकेटमधील पहिल्या शतकापासून वंचित राहिला. त्याने भारताविरुद्धच्या आपल्या सर्वौच्च ८४ धावांच्या खेळीशी बरोबरी केली. सलामीला त्याने मार्टिन गुप्टिलच्या साथीत ३५ धाना जोडल्या. गुप्टिल वैयक्तिक २१ धावांवर बाद झाल्यावर त्याने विल्यम्सनच्या साथीत नाबाद १२९ धावांची भागीदारी केली.

त्यापूर्वी, ४० वर्षीय महंमद हफिजच्या कारकिर्दीमधील सर्वोच्च ९९ धावांच्या खेळीने पाकिस्तानला समाधानकारक धावसंख्या उभारता आली होती. त्याच्या नंतर पाकिस्तानकडून महंमद रिझवानच्या २२ या सर्वाधिक धावा राहिल्या. अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळेच पाकिस्तानचे आव्हान मर्यादित राहिले. हफिजने आपल्या ५७ चेंडूंच्या खेळीत १० चौकार आणि पाच षटकार लगावले. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने २१ धावांत ४ गडी बाद केले.