सुषमा स्वराज अनंतात विलीन!

0
565

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आज पंचत्वात विलीन झाल्या. दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत सुषमा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी बासुरी यांनी सुषमा यांना मुखाग्नी दिला.

सुषमा यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यासह विदेशातीलही विविध मान्यवरांनी सुषमा यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.