सुशीलकुमारविरुद्ध ‘लुक आऊट’ नोटिस

0
321

नवी दिल्ली, दि.१० (पीसीबी) : भारताचा डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार याच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी लुक आऊट नोटिस बजावली आहे. छत्रसाल आखाड्यावर दोन गटात झालेल्या मारामारीत मल्ल सागर धनकड याचा मृत्यु झाला आणि यात सुशील कुमार सह अन्य मल्लांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला.

तेव्हापासून सुशील कुमार आणि त्याचे सहकारी बेपत्ताच आहेत. ते अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सुशीलकुमारच्या निकटवर्तियांच्या मते तो कायदेशीर सल्ला घेत असून, सर्वप्रथम त्याचा अटक टाळण्याचा आणि नंतर जामिन मिळविण्याचा सध्या प्रयत्न सुर आहे. त्याचवेळी सुशील आणि त्याचे साथीदार देस सोडून जाऊ नयेत यासाठी दिल्ली पोलिसांनी थेट लुक आऊट (एलओसी) नोटिस बजावण्याची कारवाई केली आहे.

मृत सागरचे दोन सहकारी रविंद्र आणि भगत सिंग यांनी देखील आपल्या जबाबात सशील कुमारचे नाव घेतले आहे. यामुळे आता सुशील कुमारच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. चौकश करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून एका फ्लॅटवरून मल्लांचा दोन गटात आधी बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते.

या हाणामारीत सागर गंभीर जखमी झाला आणि उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्यानंतर सुशील आणि त्याचे पाच सहकारी फरार आहेत. एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, प्रिंस दलाल असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलवरील काही व्हिडियोवरून सुशील सागरला मारत असल्याचे दिसत होते. घटना घडली त्या वेळी बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला असा एक मतप्रवाह पुढे आला आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान आणि उत्तराखंड अशा विविध ठिकाणी सुशीलचा शोध घेण्यात आला. मात्र, पोलिसांना तो सापडला नाही. अखेर, त्यांच्यापैकी कुणी देश सोडून जाऊ नये म्हणून पोलिसांनी आज अखेर त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटिस बजावली आहे.