भारतातील कोरोना संपवण्यासाठी अमेरिकन तज्ञाने सांगितला ‘हा’ एकमेव उपाय

0
1640

वॉशिंग्टन, दि. १० (पीसीबी) : अमेरिकेचे मुख्य आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी भारताला सध्याच्या कोविड-19 च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा मास्टर प्लॅन सुचवला आहे. यानुसार त्यांनी नागरिकांचं लसीकरण करणं हाच एकमेव दीर्घकालीन उपाय असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी या घात विषाणूचा सामना करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार फाऊची यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं.

फाउची म्हणाले, “कोरोनाच्या विषाणूला संपूर्णपणे संपवायचं असेल तर लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय आहे. भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे . त्यासाठी भारताला देशातूनच नाही तर देशाबाहेरुनही संसाधनं उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच भारताने एक तर इतर देशांना कोरोना उत्पादनासाठी सहकार्य करावं किंवा थेट लस दान द्यावी. एका वर्षाप्रमाणे चीनने जसे तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालयं बनवली होती तशीच रुग्णालयं भारतानेही उभी करायला हवीत.”

“भारताला रुग्णालयं उभी करावीच लागतील. लोकांना रुग्णालयात बेड नाहीत म्हणून गल्लीत मोकळं सोडून देता येणार नाही. ऑक्सिजनची स्थिती फार नाजूक आहे. लोकांना ऑक्सिजन (Oxygen Situation in India) न मिळणं हे फारच दुखद आहे. तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, पीपीई किट आणि इतर वैद्यकीय साहित्याची अडचण आहे. त्यामुळेच देशपातळीवर कोरोना संसर्ग नियंत्रणात आणायचा असेल तर देशव्यापी लॉकडाऊनची गरज आहे,” असंही फाउची यांनी नमूद केलं.