सुरतमध्ये उपासमार झालेल्या मजुरांनी केली पोलिसांवर दगडफेक

0
570

सुरत, दि. ४ (पीसीबी) शहरातील पलसाना आणि पालनपूर जकात नाक्यावर घरी जाण्यासाठी नाव नोंदवण्यासाठी आलेल्या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही सौम्य लाठीचार्ज करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. गेल्या दीड महिन्यापासून घरातच बसावे लागत असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी या मजुरांचा संयम सुटत चालल्याने आज ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे राज्याराज्यात आता घरी जाण्यासाठी परप्रांतीय मजूर घरी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गुजरात राज्यातील सूरतमध्ये मोठ्या प्रमाणात कापड आणि हिऱ्यांचा व्यापार चालतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक राज्यातून मजूर कामासाठी आलेले आहेत. यातील बहुतांश मजुर हे रोजंदारीवर काम करणारे आहे म्हणजे आज काम करायचं आणि आजचं पैसे मिळणार. गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. परिणामी या मजुरांनाही घरीचं बसावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.