सीबीआयची चौकशी करण्याचे अधिकार सरकारकडे नाहीत – अरूण जेटली

0
521

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेतील सध्याची परिस्थिती विचित्र आणि दुर्दैवी आहे. याची चौकशी करण्याचे अधिकार सरकारकडे नाहीत. केवळ केंद्रीय दक्षता आयोग या प्रकरणाची चौकशी करी शकते, त्यामुळे त्याच्या सल्ल्यानुसार एसआयटी योग्यपणे चौकशी करेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.

राफेल प्रकरणाच्या चौकशीमुळे सीबीआय आणि त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना वादात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना जेटली म्हणाले की, विरोधकांचे आरोप निराधार आहेत. दोन्ही अधिकारी पदावर असताना त्यांची चौकशी  करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पदावरून दूर केले आहे. मात्र, ते चौकशीत निर्दोष असल्याचे सिध्द झाल्यास ते पुन्हा पदभार घेतील, असे जेटली म्हणाले.

दरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक व दोन नंबरचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यामध्ये हा वाद झाला आहे. अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआय एजन्सीचे पोलीस उपअधीक्षक देवेंद कुमार यांना अटक करण्यात आली आहे.