सिलेंडर मधून गॅस चोरी; दोघांवर गुन्हा एकास अटक

0
427

देहूरोड, दि. ३० (पीसीबी) – गॅस सिलेंडर मधून गॅसची चोरी करताना पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या कामगारासह गॅस एजन्सीच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास दत्तनगर, किवळे येथे करण्यात आली.

अविनाश हरी नांगरे (वय 24, रा. दत्तनगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गॅस एजन्सीचा मालक संतोष (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष याची गॅस एजन्सी आहे. दत्तनगर किवळे येथे पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी अविनाश बुधवारी सकाळी भरलेल्या गॅस सिलेंडर मधून लहान आकाराचे तीन ते पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत होता. गॅस चोरत असताना अविनाश याने कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नाही.

याबाबत आरोपी संतोष याला माहिती होते. त्याने रिकामे खाली झालेले गॅस सिलेंडर गोडाऊन मध्ये जमा न करता भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरित करण्यासाठी न जाता गॅस चोरीसाठी सहाय्य केले. आरोपींकडून 21 हजार 903 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, 300 रुपयांचे दोन पितळी धातूचे रिफील, 220 रुपयांचे दोन नारंगी पाईप असा ऐवज जप्त केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.