पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला

0
542

निगडी, दि. ३० (पीसीबी) – मित्राने घरी येऊन बाहेर फिरायला जाऊ म्हणून अल्पवयीन मुलाला घराबाहेर आणले. त्यानंतर चार जणांनी मिळून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. तसेच परिसरात दहशत माजवली. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ओटास्किम, निगडी येथे घडली.

दीपक पवार (वय 22, रा. ओटास्किम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानवाज मुस्ताक शेख (वय 17, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हा घरी असताना शेख याचा एक अल्पवयीन मुलगा घरी आला. त्याने ‘बाहेर फिरायला जाऊ’ असे म्हणून फिर्यादीला घराबाहेर नेले. अंकुश चौक येथील भाजी मंडईच्या पाठीमागे नेऊन मित्राने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दीपक पवार याने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपींनी भाजी मंडई परिसरात दहशत निर्माण केली. त्या दहशतीमुळे लोकांनी त्यांची दुकाने व टप-या बंद केल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.