सिनेमा इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, ते परस्पर सहमतीने होते – शिल्पा शिंदे

0
811

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ‘लैंगिक शोषणाची घटना जेव्हा घडते त्याचवेळी त्याविरोधात आवाज उठवा, नंतर बोलून काही उपयोग नाही. सिनेमा इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, बळजबरी होत नाही. ज्या गोष्टी होतात त्या परस्पर सहमतीने होतात,’ असे सांगत ‘भाभीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदेने खळबळ उडवून दिली आहे.

बिग बॉस ११ ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे ही स्वत: लैंगिक शोषणाची बळी आहे. वर्षभरापूर्वी तिने ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेचा निर्माता संजय कोहलीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या घटनेतून आपण खूप काही शिकलो असल्याचे तिचे म्हणणे आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ती म्हणाली, ‘ज्यावेळी घटना घडते त्याचवेळी तुम्ही बोलायला हवे. नंतर बोलून काही उपयोग नाही. तुमचे म्हणणे कोणी ऐकणार नाही. केवळ वाद होणार, बाकी काही नाही. ‘ तिच्याबाबतीत शोषणाचा प्रकार घडला तेव्हा कुणीही तिच्या मदतीला धावून आले नाही, हेही तिने आवर्जून सांगितले. ती म्हणते,’माझ्या वेळी काही कलाकारांनी मला बोलूच दिले नव्हते. माझी लढाई मी स्वत:च लढले. आताही जे होत आहे ते सर्व बकवास आहे.’

शिल्पा म्हणाली, ‘लैंगिक शोषणाचे प्रकार केवळ मनोरंजन क्षेत्रातच होत नाहीत, सगळीकडे होतात. पण लोक या इंडस्ट्रीचंच नाव का खराब करतात, ते कळत नाही. जे इथे काम करतात ते सगळेच वाईट आहेत का? असे नाहीए. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. तुमच्याशी समोरची व्यक्ती कशी वागते, तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देतात. हा सर्व गिव्ह अँड टेक पॉलिसीशी संबंधित आहे. महिला आता बोलताहेत. पण मी मागेही बोलले होते की इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत. जे होते ते परस्पर सहमतीने होते. जर तुम्ही तयार नाहीत तर बस तुम्ही ती बाब तिथेच सोडून द्या. कोणी समोरून प्रतिसाद देत असेल तर कोण मनाई करत नाही. आपल्याला आपली मर्यादा ठरवायला हवी.