सिद्धीविनायकनगरी निगडी पोलिस ठाण्याला जोडावे; मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

0
926

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील सिद्धिविनायकनगरीचा परिसर निगडी पोलिस ठाण्याला जोडावे, आकुर्डी पोलिस चौकी आकुर्डीगावात उभारण्यात यावे तसेच रावेतमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा परिसर चिंचवड पोलिस ठाण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बुधवारी (दि. १७) भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. निगडीचे शेवटचे टोक असलेले सिद्धीविनायकनगरी परिसराचा देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना एखाद्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी ७ किलोमीटर लांब असलेल्या देहूरोड पोलिस ठाण्यात जावे लागते. हे तेथील नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. सिद्धीविनायकनगरी ही निगडी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर निगडी पोलिस ठाण्याला जोडल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल.

आकुर्डी पोलिस चौकी ही निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आहे. त्यामुळे आकुर्डीगाव व परिसरात घडलेल्या गुन्ह्यांची तक्रार देण्यासाठी नागरिकांना भक्ती-शक्ती चौकात जावे लागते. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आकुर्डीगावातच आकुर्डी पोलिस चौकी उभारण्यात यावी. रावेतमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा परिसरही देहूरोड पोलिस ठाण्याला जोडण्यात आला आहे. हे पोलिस ठाणे या परिसरापासून लांब आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा परिसर जवळच असलेल्या चिंचवड पोलिस ठाण्याला जोडण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात स्वतंत्र पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे.