‘साहेब तुम्हीच शेतकऱ्यांना आरक्षण का नाही दिले ?’; राम सातपूते यांचे शरद पवारांना खुले पत्र

0
608

साहेब आपल्या या मागणीत मला शेतकऱ्यांची तळमळ कमी आणि राजकारणच जास्त वाटतंय आपली कालची पत्रकार परिषद म्हणजे गेलेली सत्ता परत कशी येईल याची धड़पड होती हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. अनेक वर्ष आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, त्यानंतर सलग १५ वर्ष आपलं सरकार ही महाराष्ट्रात होतं. तरी पण शेतकऱ्याला आरक्षण मागायची वेळ आपल्यावर आली हे दुर्दैवच म्हणाव लागेल बाक़ी दुसरं काय ?

अनेक दशकं महाराष्ट्र आपल्या ताब्यात असताना आपण बारामतीच्या पलीकडं केव्हाच विचार केला नाही हे आपल्या या मागणी मधुन स्पष्ट झाल आहे.  जर आपल सरकार असताना नीट काम झाली असती तर आज हे शेतक़री आरक्षण मागायची वेळ तुमच्यावर आली नसती हे साहेब आपण लक्षात घेतलं पाहिजे.

आपण महाराष्ट्रा च्या राजकारणाचे भगवान शंकर आहात* आपल्याला हे पण ठाऊक आहे की शेतकऱ्याला आरक्षण देता येत नाही तरी पण संभ्रम निर्माण कसा होईल यासाठी अशी चूकीची मागणी करायची वेळ आपल्यावर आली आहे हे मात्र दूर्दैवच आहे साहेब. शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नावर आपण नेहमीच वर वर मलम पट्टी केली आणि आपल्या गावागावातील राष्ट्रवादी आणि कांग्रेसच्या लोकांनी कायम शेतकरी आणि गोरगरीब लोकांना भेटलेली मदत ही स्वतःच मलई म्हणून खाल्ली हे कदाचित विसरला आहात आपण साहेब. आपण अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता मग आपण का नाही दिलं शेतकऱ्यांना आरक्षण, याचा विचार करा ना साहेब कधीतरी ? आपण केंद्र सरकार मध्ये कृषि मंत्री असताना  क्रिकेट खेळत बसलात अन आता शेतकऱ्यांची आठवण येते का तुम्हाला ? व्वाह रे पुतण्या मावशीचं प्रेम… बस करा साहेब ऊतु जाईल ,किती तुमचं ते शेतकरी प्रेम….

आपण क्रिकेटमध्ये प्रचंड क्रांती आणली पण सत्ता असताना कधीतरी IPL सोडुन शेतकरी प्रश्नाकडं पण जरा लक्ष दिलं असतं तर सत्ता गेली म्हणूण आपल्याला आपल्या राजकीय वारसदारांच्या भविष्याच्या चिंतेने अशा चुकीच्या मागण्या घेऊन पत्रकार परिषदा घ्यायची वेळ कधीच आली नसती. वाडया वस्त्यावरचे रस्ते असोत किंवा गावात प्यायचं पाणी देणारी स्वजल धारा योजना किंवा साठवण तलाव. आपल्या कार्यकर्त्यानी रस्ते कामात फक्त मुरुम टाक़ुन पैसे ऊचलले तर कधी स्वजलधारा योजनेमध्ये जमिनीत पाईप न गाडता फक्त वर नळ काढ़ून पैसे लाटले हे मी आपणास ठाम सांगू शकतो. कदाचित शेतकरी आरक्षण मागताना आपण आपले गावागावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते जनतेचे पैसे खाउन खाऊन किति गर्भश्रीमंत झाले आहेत याचा ही विचार केला असेलच. नेत्यांच्या मागे पायी फिरणारा आपला कार्यकर्ता कधी फोर्च्युनर घेऊन फिरतो हे त्याला पण समजत नाही. महाराष्ट्रात आपलं सरकार असताना मावळच्या शेतकऱ्यांना गोळीबारामध्ये ठार मारलं हे महाराष्ट्र कधीच विसरनार नाही. आणि विसरेल तरी कसा ?

साहेब, आपल्या सरकारच्या काळात आपण आणलेल्या शेतकरी योजना या शेतकरी हितार्थ कधीच नव्हत्या तर त्या फक्त आणी फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता सक्षमीकरणाच्या योजना होत्या. या योजनेला प्रचंड यश ही भेटलंय. आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी दोन – दोन दिवस रांगेत उभ रहावं लागायचं तेव्हा नाही का हो वाटल आपल्याला शेतकरी आरक्षण दिलं पाहिजे ! आता मागेल त्याला, पाहिजे तितक खत मिळत आहें.

आपलं सरकार असताना माझ्या वडिलाच्या नावावर एक विहिर सरकारने दिली. अशा तालुक्यात शेकडो विहिरी मंज़ूर झाल्या परंतु आपल्या पक्षाच्या एका नेत्याला प्रत्येक विहीरी मागे पैसे दिले नाही म्हणून आजवर त्या शेकडो विहिरीची काम झालीच नाहीत. कदाचित आपल्या पक्षाच्या लोकांचे भ्रष्टाचारी प्रकरण पाहुन शेतकरी आरक्षण नावाची वर वर गोंडस वाटनारी आणि शक्य नसलेली मागणी करत आहात. पत्रकार परिषद साठी आपल्या डाव्या हाताला बसलेल्या सुनील तटकरे यांना वडीलधारे पणाच्या नात्याने विचारा कधीतरी. सींचन घोटाळा केला लाज वाटली नाही का कधी ते ? साहेब, शेतकरी मारला तुम्ही आणि शेतकरी आरक्षण मागत आहात तुम्हीच?

इतकी वर्ष सरकार असताना शेतकरी प्रश्नावर आपण आणि आपल्या पक्षानं काय दिवे लावले आहेत हे एका ग्रामीण असाह्य गरीब शेतकरी कटुंबात जन्माला आलोय म्हणून चांगल जाणतो. इतकी वर्ष सरकार असताना फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या पलीकडं आपल्या सरकारने काय दिवे लावले हे महाराष्ट्राला आणि खास करून माझ्यासारख्या शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्यांना चांगलं ठाऊक आहे. आपण ही चिंतन करावं या अपेक्षेसह..!