‘सावत्र पित्याकडून अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी’; श्वेता तिवारीच्या मुलीची पोस्ट

0
454

मुंबई, दि. १४ (पीसीबी)-  प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीला घरगुती हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. पत्नीला मारहाण व मुलीसाठी अश्लील भाषा वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात श्वेताची मुलगी पलक हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. सावत्र पित्याने आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या कठीण काळात जे लोक मदतीला आले त्यांचे आभार मानत पलकने पोस्ट लिहिली. ‘काही गोष्टी मला स्वत:ला स्पष्ट करून सांगायच्या होत्या, म्हणून मी ही पोस्ट लिहितेय. फक्त बातम्या वाचून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमेंट करणे खूप सोपे असते पण त्यांच्या आयुष्यात खरे काय घडले हे कोणालाच जाणून घ्यायचे नसते. माझ्या आईने काय सहन केले आहे हे माझ्यापेक्षा चांगले कोणालाच माहित नाही. त्यामुळे या घटनांबाबत माझे मत सर्वांत अधिक महत्त्वाचे ठरते,’ असे तिने लिहिले.

अभिनव कोहलीने पलकला मारहाण केल्याच्या वृत्ताला फेटाळत तिने पुढे लिहिलं, ‘अभिनव कोहलीने माझा शारीरिक छळ कधीच केला नव्हता ना मला त्याने कधी अनुचित प्रकारे स्पर्श केला. मात्र त्याने अनेकदा माझ्यासाठी अश्लील भाषा वापरली. कोणत्याही महिलेने असे शब्द ऐकले असते तर तिलाही त्याची लाज वाटली असती. असे शब्द, अशी भाषा जे एका स्त्रीच्या सन्मानाबद्दल प्रश्न उपस्थित करतील, असे शब्द जे एखाद्या महिलेला कोणत्याच पुरूषाकडून अपेक्षित नसतील, वडिलांकडून तर नक्कीच नाही. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून आमच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल वाचणे खूप सोपे आहे. मुलगी म्हणून गर्वाने सांगू इच्छिते की माझी आई ही माझ्यासाठी सर्वांत आदरणीय व्यक्ती आहे. ती आज जे काही आहे ते तिने स्वकर्तृत्वाने मिळवले असून आयुष्यात कधीच तिला त्यासाठी पुरुषाची गरज लागली आहे.’