साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी; सहाजण गंभीर

0
479

सातारा, दि.०९ (पीसीबी) : साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली. बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

साताऱ्यात रात्री सव्वा आठच्या आसपास सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. याच ठिकाणी बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारामारीत शस्त्रांचा वापर झाल्याचे चर्चा आहे.

याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारामारीत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मारामारी झाल्यावर रुग्णालयाच्या परिसरात समर्थक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.

बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला. पिस्तुलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला.