‘राष्ट्रवादीची उरलीसुरली लाज गेली…नव्हे, भाजपावर मात केली’ – थर्ड आय – अविनाश चिलेकर 

0
1275

वळणाचे पाणी वळणालाच जाते, ते हजार टक्के खरे. काल बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीला (बाजारात) त्याचे प्रत्यंतर आले. भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत यथासांग लोळत होते म्हणून मतदारांनी २०१७ मध्ये तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेसला मानगुटीला पकडून बाजुला केले. गेल्या पाच वर्षांत भाजपाने राष्ट्रवादीपेक्षा कहर केला आणि पालिका लुटली म्हणून लोक पुन्हा ‘राष्ट्रवादीच बरी होती’, म्हणू लागले. पण गाढवाचे नाव ‘गोपाळशेठ’ ठेवले म्हणून ते ‘शेठ’ होत नाही. शेवटी गाढव ते गाढवच. त्याला पुरणपोळी दिली तरी ते उकिरड्यावरच जाणार. इतक्या कठोर भाषेत सांगायचा हेतुही तसाच आहे. कारण तीन आठवड्यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि महापालिकेतील चार कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ८ दिवस सर्वांनी जेलची हवा खाल्ली. लांडगे यांची पत, प्रतिष्ठा गेली. सत्ताधारी भाजपाचा स्थायी समिती अध्यक्ष सापडला म्हणून राष्ट्रवादाला हातात आयतेच कोलीत मिळाले. सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकिपर्यंत हे भांडवल पुरेल अशा थाटात राष्ट्रवादीने दोन वेळा जोरदार आंदोलन केले. दर बुधवारी तीव्र आंदोलन करून भाजपाला उघडे पाडायचे असेही ठरले. भाजपाच्या भ्रष्टाचारावर अक्षरशः टाहो फोडला. वाजंत्री लावले, भुते, जोगते, गोंधळी आणले, दोन आमदारांचे प्रतिक म्हणून दोन नंदिबैल मिरवले आणि भाजपा किती भ्रष्टाचारी आहे यावर राणा भिमदेव थाटात भाषणे झडली. स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा होत नाही तोवर शांत बसणार नाही, समिती बरखास्त करायला भाग पाडणार, समितीच्या बैठकिला यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य नसतील, भाजपाच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही, अशा मोठमोठ्या वल्गना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केल्या. समितीच्या कारभाराची पहिल्यापासून चौकशी करा, १६ सदस्यांची मालमत्ता शोधा, अशीही पत्रकबाजी झाली. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून, महापालिकेतील भाजपाच्या भ्रष्टाचाराची चौकशी लावण्याची मागणीही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केली. हे सगळे पाहिल्यावर आता भाजपाची खैर नाही, निवडणुकित या मुद्यावर भाजपा मार खाणार, यांचा टागां पलटी होणार असा सर्वांचा अंदाज होता. भाजपाचे आमदार, नेतेसुध्दा अस्वस्थ होते. रात्रीतून काय साक्षात्कार झाला आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी नेत्यांचा आदेश आहे सांगत नेत्यांचाच आदर्श समोर ठेवत `यू टर्न` घेतला. काल बुधवारच्या स्थायी समिती बैठकिला राष्ट्रवादीचे चारही सदस्य आणि शिवसेनेचा १ सदस्य उपस्थित होते. ४२ कोटींचे विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर झाले. आयत्यावेळचे विषय, सल्लागारांवरची उधळपट्टी, वाढीव खर्च असे आक्षेपार्ह अनेक विषय होते. एकालाही राष्ट्रवादीच्या सदस्यांने विरोध केला नाही. विकास कामाला विरोध नको म्हणून बैठकित सहभागी झाल्याचे लटके समर्थन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. खरे कारण ते नव्हते, तर गेल्या दोन बैठकांना जे ५०-६० कोटींचे विषय झाले त्यावरची २-३ टक्क्यानुसार जी टक्केवारी होते ती वाट्याला येणार नाही याचीच धास्ती होती. सत्तेसाठी पार्टी वुईथ डिफरन्ट भाजपाने तत्व, न्याय, निष्ठा याला केव्हाच तिलांजली दिली आहे. राष्ट्रवादीकडे यातले काही नव्हतेच त्यामुळे गमावण्याचा प्रश्नच नाही. पहिल्यापासून गुंड, गुन्हेगारांना बरोबर घेऊन जाणारा, भ्रष्ट्रवादी असलेला पक्ष ही प्रतिम असल्याने राष्ट्रवादीला त्याचे काहीच वाटले नाही. एकूणच काय तर राजकारणात निर्लज्जपणाचा अगदी कळस झाला.

राष्ट्रवादीने भाजपावर अशी केली मात –
लाचखोरी प्रकऱणातून मोठे राजकारण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाळ्यात आयतीच शिकार सापडली होती. नितीन लांडगे अर्थात शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी माजी आमदार ज्ञानेश्वर तथा माऊली लांडगे यांचा चिरंजीव असलेला मोहरा हातात आला. त्यातूनच भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि एकूणच भाजपाला नामोहरम कऱण्याचे डावपेच सुरू झाले. ३० वर्षे काकांच्या तालमित तयार झालेल्या अजित पवार यांनी या संधीचा पध्दतशीर फायदा घेतला आणि भाजपावर मात केली. तशी ही नूरा कुस्तीच झाली, पण भाजपाला राष्ट्रवादीने चितपट केले. सुरवातीला या प्रकरणात भाजपाची होता होईल तेव्हढी बदनामी होऊ दिली. राष्ट्रवादीच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी आंदोलन करून दबाव वाढवला. नितीचे धडे देणाऱ्या भाजपाची अब्रू वेशीला टांगली. सगळ्या बाजुंनी जवळपास कोंडी केली. प्रकऱण वाढवू नये म्हणून सुरवातीला काही जुन्याजाणत्या मंडळींनी अजितदादा पवार यांच्याकडे शब्द टाकला तर, तिकडून उत्तर आले, “तुमचा दादा ( आमदार महेशदादा लांडगे) आहे, आता त्यालाच सांगा की…“. थोडक्यात तुमचे तुम्ही पाहा, असाच सांगावा होता. त्यामुळे आता भाजपाचे खरे नाही, असा संदेश गेला आणि घाबरगुंडी उडाली. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी स्वतः शरद पवार यांच्याकडे आणि नंतर अजित पवार यांच्याकडे कळकळीची विनंती केल्याची चर्ची होती. झाले गेले गंगेला मिळाले, पोराला सांभाळून घ्या, अशी मिनतवारी माऊलींनी केली म्हणतात… भाजपाचे नितीन लांडगे यांचे वडिल माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे शरण आले म्हणजेच भाजपा शरण आली. त्यानंतर अजित पवार यांचा आदेश आला आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी स्थायी समिती बैठकिला उपस्थिती लावली. एक प्रकारे भाजपाला पवार यांच्यापुढे लोटांगण घावाले लागले, झुकावे लागले. भोसरीतील बहुसंख्य भाजपा नगरसेवकांचे भाजपाबद्दलचे प्रेम निव्वळ बेगडी असल्याचे या निमित्ताने दिसले. ही मंडळी कधी राट्रवादीच्या गोटात सामिल होतील याचा तपास खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही लागणार नाही. एक नक्की भाजपाची नांगी राष्ट्रवादीने ठेचल्याने आगामी काळात भाजपाला वर तोंड करून राष्ट्रवादी विरोधात बोलायचा नैतिक अधिकार आता राहिलेला नाही. आमदार महेश लांडगे किंवा भाजपाडून राष्ट्रवादीला होणाऱ्या विरोधाची धारसुध्दा आता बोथट असेल. लाचखोरी आणि नंतरची शरणागती यातून आता अनेक अर्थ निघतात. भाजपामध्ये आगामी काळात उभी फूट पडणार, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. भ्रष्ट्राचाराचा मुद्दा आता निवडणूक प्रचारातून दिसणार नाही, कारण राष्ट्रवादीने आताच लाचखोरी प्रकरणातून त्याचा निकाल लावून टाकला. राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही पक्ष भ्रष्ट्राचारावर बोलूच शकत नाहीत. ४० वर्षे या शहराचे राजकारण हे गावकी भोवतीच पिंगा घालते आहे, तेही दिसले. गावकीचे तमाम सरदार, वतनदार, कारभारी नितीन लांडगे यांच्या मागे पक्षभेद विसरून ठामपणे उभे होते. अजित पवार यांनी वाद मिटविल्याने आता गावकीची नाराजी दूर होईल. अखेर भाजपाचे नेते नाही तर पवार कंपनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच कामी आल्याचा मोठा संदेश गावकीत गेला. गावकी भावकी पूर्णतः भाजपाकडे सरकली होती, ती आता पुन्हा पवार यांच्या बाजुने उभी राहू शकते. एकूणच शहराच्या राजकारणालाही एक मोठी कलाटणी मिळू शकते. प्रकरण, प्रसंग छोटा आहे, पण त्यातून सत्ताबदलालाही हवा मिळू शकते. राष्ट्रवादीची ही खेळी यशस्वी झाली. अजित पवार यांनीच बाजी मारली, असेही म्हणता येते.

‘…आता आमदार लक्ष्मण जगताप यांचे काय ?’
लाचखोरी प्रकऱणातून भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची शेंडी अजित पवार यांच्या हातात गेली. दादा पवार यांना जे साध्य करायचे ते त्यांनी साधले. आता बारी भाजपाचे दुसरे बलाढ्य आमदार लक्ष्मण जगताप यांची आहे. सेवा विकास बँकेच्या ४७२ कोटी रुपयेंच्या घोटाळ्यात ही बँक डब्यात गेली. पोलिस आयुक्तांनी त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे पत्रकारपरिषदेत सांगितले. १२४ प्रकऱणांतून ३९ समुहांनी मिळून बँकेला गंडा घातला. आमदार जगताप यांचे उजवे हात समजले जाणारे माजी नगरसवेक आणि बँकेचे चेअरमन अमर मुलचंदानी यांना त्यात अटक झाली. मोठ्या प्रयासाने आता ते जामिनावर बाहेर आलेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करताना, भाजपाच्या पाच वर्षांच्या काळातच ही बँक खड्यात गेली आणि अमर मुलचंदानी चुकिचे काम करत असल्याचे सांगूनही त्याला भाजपाच्या नेत्यांनी (आमदार जगताप) पाठीशी घातले, असा जाहीर आरोप केला. त्यामुळे आता हे प्रकऱणसुध्दा भाजपाला खूप महागात पडू शकते. दुसरा मुददा औंधचे उद्योगपती नानासाहेब गायकवाड यांच्या विरोधात सावकारी, दमदाटीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गायकवाड हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. आजवर जगताप यांच्या आड लपलेल्या गायकवाड यांचे एक एक कारनामे सुरू होते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपशिल पाहून हा माणूस किती भयंकर होता से लोक बोलतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड़ पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे इतके गंभीर आहेत की १०० कोटींचे साम्राज्य असलेल्या गायकवाड अक्षरशः उद्वस्त झाले. सेवा विकास आणि नानासाहेब गायकवाड या दोन प्रकरणांत आमदार लक्ष्मण जगताप यांची बोलती बंद झाली आहे. त्यांनाही आता अजित पवार यांच्यापुढे लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नाही. इथेही अजित पवार यांनी भाजपाची शिकार केली. थोडक्यात महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप या दोन्ही आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अजित पवार यांचे हे दबाव तंत्र यशस्वी झाले तर महापालिकेत भाजपाची सत्ता सोडाच आगामी काळात भाजपाला उमेदवार मिळने कठिण होईल. शुक्रवारी पुणे भेटीत आमदार जगताप यांची अजित पवार यांच्या बरोबरची दीड-दोन तास बंद दाराआड चर्चा कशासाठी होती ते अद्याप बाहेर आलेले नाही.