साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील रिंगणात

0
943

सातारा, दि. १ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीने अखेर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नांवाची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले आणि पाटील अशी रंगतदार लढत  होणार आहे. गुरुवारी (दि.३) श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पोट निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून  माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने, नितीन पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण सक्षम आणि दमदार उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. मात्र सर्वसमावेशक आणि काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होणारे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही होते.

परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने  पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता उदयनराजे भोसले विरूद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत रंगणार आहे.  श्रीनिवास पाटील गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शरद पवार  उपस्थित राहणार आहेत.