गॅसचा भडका; सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ

0
394

मुंबई, दि. १ (पीसीबी) एकीकडे महागाई वाढत असतानाच घरगुती सिलिंडरच्या दरातही आजपासून (मंगळवार) वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यानत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात १५ रूपये ५० पैशांची वाढ करण्यात आली होती.

दरवाढीनंतर मुंबई आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी अनुक्रमे ५७४.५० रूपये आणि ६२० रूपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकात्यामध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६०५ रूपये मोजावे लागतील. १९ किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरची किंमत दिल्लीत १ हजार ८५ रूपये, तर कोलकात्यात आणि मुंबईत अनुक्रमे १ हजार १३९ रूपये आणि १ हजार ३२ रूपये इतकी झाली आहे.

तर दुसरीकडे ओएनजीसी आणि इंडियन ऑईल लिमिटेडद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत कमी करून ३.२३ डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट केल्याची माहिती पेट्रोलिअम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलकडून देण्यात आली. १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी हे नवे दर लागू असतील. नवी दिल्लीत याची किंमत ५९० रूपये प्रति सिलिंडर झाली आहे. दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित केल्या जातात. दरवर्षी १ एप्रिल आणि १ ऑक्टोबर रोजी नव्या दरांची घोषणा करण्यात येते.