साई चौक उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याच्या कामाला सुरूवात

0
768

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – पिंपळेनिलख येथील साई चौकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाला साई चौकातील कमी उंचीच्या विद्युत वाहिन्यांचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्यात येणार आहे. त्याच्या कामाला नुकतीच सुरूवात करण्यात आली.

भाजपच्या स्थानिक नगरसेविका निर्मला कुटे यांनी या कामांसाठी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. साई चौकातील उड्डाणपुलाला विद्युत वाहिन्यांचा अडथळा ठरत आहे. या वाहिन्यांची उंची कमी असल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळणार होते. त्यामुळे नगरसेविका कुटे यांनी या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्याची मागणी केली होती.

नगरसेविका कुटे यांनी केलेल्या मागणीनुसार उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढविली जाणार आहे. त्याच्या कामालाही नुकतीच सुरूवात करण्यात आली. नगरसेविका कुटे यांनी जागेवर जात कामाची पाहणी केली. यावेळी विद्युत विभागाचे कावळे उपस्थित होते. या कामामुळे वाहतुकीला व पादचाऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.