राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेंचा शिवसेनेत प्रवेश  

0
795

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – कोल्हापुरातील हतकणंगले मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज (शनिवार)  शिवसेनेत प्रवेश  केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांना शिवबंधन बांधले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,  कोल्हापूरातील शिवसेने नेते संजय मंडलिक  आदी  उपस्थित होते.  काही दिवसापूर्वीच माने यांचे चिरंजीव धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला पक्ष सदस्यत्वाचा  राजीनामा दिला होता. निवेदिता माने या इचलकंरजी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. तर त्यांचे सुपुत्र धैर्यशिल माने हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते.  माने  यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. माने यांच्या शिवसेना प्रवेशामुळे  राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व  खासदार राजू शेट्टी यांची शरद पवार यांनी  महाआघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे निवेदिता माने नाराज झाल्या होत्या. या मतदारसंघातून धैर्यशील माने लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. मात्र, शेट्टी यांची उमेदवारी जाहीर केल्याने माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.  कोल्हापूर दौऱ्यादरम्यानही शरद पवारांनी माने यांच्या  नाराजीची दखल घेतली नव्हती. त्यामुळे माने गट दुखावला गेला होता.