सांगा… कामगारांना पगार करायचे कसे, कुठून ?

0
857
  • कोरोनाच्या टाळेबंदित हातघाईला आलेल्या लघु उद्योजकांचा सवाल

पिंपरी,दि.२४ (पीसीबी) – कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी सुरू करुन महिना लोटला, मात्र परिस्थिती अधिक बिघडत असल्याने चिंता वाढली आहे. सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील कारखानदार अडचणीत आहेत. माणुसकिच्या भावनेने कर्तव्याचा भाग म्हणून गेल्या महिन्यात सर्वांते पगार केले, पण आता आवक शून्य टक्का असल्याने कामगारांचे पगार करायचे कसे अन् कुठून असा रोकडा सवाल कारखानदारांनी उपस्थित केला आहे.

सुमारे १५ हजार लघु व मध्यम उद्योगांतून दहा लाखांवर कामगार काम करतात, त्यांच्याही भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे गेले महिनाभर १०० टक्के टाळेबंदी होती. आता आगामी काळात आर्थिक मंदीची भीती सतावते आहे. वाहन उद्योगाला तर एकदम ब्रेक लागला आहे. त्यामुळे या लघु उद्योजकांच्या ऑर्डर्समध्येही २० ते २५ टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी, वाहन उद्योग श्रृंखलेतील अविभाज्य भाग असलेल्या या उद्योगाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्मचारी कपात करण्याशिवाय या कारखानादारांपुढे  पर्याय उरलेला नाही. 

पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे, रांजणगाव आणि पुणे जिल्ह्यातील इतर औद्योगिक भागांत ऑटोमोबाईल ओरिजिनल इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्‍चरर्स (ओईएम) या लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. त्याशिवाय या भागातील टाटा मोटर्स, बजाज, फोक्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, महिंद्रा अँड महिंद्रा, जेसीबी, स्कोडा, हुंदाई या कंपन्यांच्या प्रकल्पांमध्येही या लघु उद्योगांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. येथील उद्योजकांनी अनुकूल वातावरण निर्मिती केल्याने दर्जेदार मनुष्यबळ तयार होऊन व्यवसायवृद्धी होण्यासही मदत झाली.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत वाहन उद्योगातील जोरदार वाढ लक्षात घेऊन,  या भागातील एमएसएमई युनिट्सना क्षमता वाढवण्यासाठी संस्थात्मक वित्तपुरवठा केला गेला. उच्च उत्पादन आणि कामगारांना ओव्हरटाईम मिळवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी बर्‍याच ओईएम युनिट्सनी तीन शिफ्ट्समध्येही काम केले. मात्र जानेवारीपासून छोट्या कंपन्यांना मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. कारण ओईएम विक्रीशी झगडत असताना, त्याची झळ विक्रेते आणि उपविक्रेत्यांनाही बसत आहे. या विक्रेते आणि उपविक्रेत्यांकडे दिलेल्या ऑर्डर्सचे प्रमाणही घटले आहे. मंदीमुळे कंपन्यांनी ओव्हरटाईम पूर्णपणे बंद केला. कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कंत्राटदारांची निवड प्रक्रियाही कंपन्यांनी थांबवली आहे. त्यामुळे जिथे कंत्राटदारांनाच काम नाही, अशा ठिकाणी कंत्राटदारांकडील बेरोजगार कामगारांची संख्या निश्‍चित करणे कठीण झाले आहे. 

थकीत कर्जदार’ शिक्का नको

बँक कर्जाची परतफेड करणे आणि थकीत कर्जदार असा कंपनीच्या नावावरील शिक्का टाळणे ही प्रामुख्याने दोन आव्हाने पुण्यातील या कारखानदारांपुढे आहे. इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आणि बँक कर्ज यांच्यातील दरी कायम राहिल्यास, हे छोटे उद्योग बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. २००८ च्या आर्थिक मंदीतही पुण्याच्या या भागातील अंदाजे 20 टक्के युनिट्स बंद पडली होती, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

 

देणेकऱ्यांचे फोन सुरू झालेत …

पिंपरी चिंचवड शहरात ११ हजार लहान मोठे उद्योग आणि सुमारे ४.५ लाख कामगार आहेत. दीड लाख कामगार कोरोनाच्या भितीने गावाकडे निघून गेलेत. ज्यांची कुटुंब इथे आहेत तेच थांबले. मागच्या महिन्यांत कर्तव्याचा भाग म्हणून सर्व कारखानदारांनी पगार दिले, पण महिनाभरात एक रुपयेंची आवक नसल्याने पुढचे पगार कसे व कुठून करायचे याची चिंता लागून राहिली आहे. त्याशिवाय कच्चा माल ज्यांच्याकडून आणला (देणेदार) त्यांचे फोन सुरू झालेत. बँकेचे हप्ते, व्याज चुकत नाही. कामगारांचे पगार करायचेत पण पैसा आणायचा कसा अन् कुठूण हा गहन प्रश्न आहे.पिंपरी चिंचवड शहरातील कारखानदारीची दैनंदिन सुमारे ५०० कोटींची उलाढाल ठप्प आहे. सरकारनेच आता मदत केली पाहिजे.

  • श्री. संदीप बेलसरे , अध्यक्ष – पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना

 

सरकारनेच आता मदत करावी… –

चाकण परिसरात ६५० यनिटस् आणि सुमारे ४ लाख कामगारांची संख्या आहे. कोरोना टाळेबंदीमुळे तब्बल एक हजार कोटींची दैनंदिन उलाढाल थांबली आहे. ३५ ते ४० टक्के कामगार आपापल्या घरी गेलेत. दुसरीकडे कोरोनाची भिती आणखी वाढली आहे. गेल्या महिन्यात पगार केले आता चिंता सतावते आहे. सरकारने बेरोजगार भत्ता सुरू करावा, अशी सुचना संघटनेने केली आहे. बजाज, हुंदई, ब्रिजस्टोन, टेट्रापॅक, कल्याणी आनंद महिंद्रा ग्रुप, स्कोडा अशा मोठ्या कंपन्या या भागात आहेत. आता सरकारनेच विचार करावा.

  • श्री. दिलीप बटवाल, सचिव – फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज