सांगवीतील अटल महाआरोग्य शिबीरात ५१ हजार रुग्णांची तपासणी, १ हजार ३०० रुग्णांची ह्दय तपासणी

0
543

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित तीन दिवसीय मोफत अटल महाआरोग्य शिबीरात तब्बल ५१ हजार २७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात १ हजार ३०० रुग्णांची ह्दय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ रुग्णांवर अँजिओग्राफीची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. १४) दिली.

या शिबीराबाबत अधिक माहिती देताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून सांगवीत ११ ते १३ जानेवारी या तीन दिवसांत मोफत अटल महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. त्याचा शहरातील आणि आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना लाभ झाला. या शिबीरात डोळ्याच्या आजारांशी संबंधित ८ हजार ३४९, कान, नाक व घसा आजारांशी संबंधित २ हजार १२०, कॅन्सर आजाराशी संबंधित ८९१, हाडाच्या आजारांशी संबंधित १ हजार ७५४, दातांच्या आजाराशी संबंधित ३ हजार ६९५ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

शिबीरात सर्व रोगांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकूण ५१ हजार २७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ५ हजार ५०० रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले. २३० रुग्णांना श्रवणयंत्र मोफत वाटण्यात आले. दाताचे आजार झालेल्या ३ हजार ३०० रुग्णांची, हाडांच्या आजारांशी संबंधित १ हजार ७५४ रुग्णांची, त्वचाविकार झालेल्या २ हजार रुग्णांची, स्त्रीरोग व कॅन्सरसदृश्य आजार झालेल्या ३ हजार ५८३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात १ हजार ३०० रुग्णांची ह्दय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ रुग्णांवर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय ३२ अपंगांना जयपूर फूट, ८ रुग्णांना व्हिलचेअर वाटप करण्यात आले आहेत.

या शिबिरासाठी सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी चांगले सहकार्य केले. याशिवाय भाजपचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्यावतीने शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली गेली. या सर्वांच्या बळावर हे शिबिर यशस्वी झाले आहे. या आरोग्य महाशिबिराला गोरगरीब रुग्णांनीही तेवढाच चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या शिबीरात पिंपरी चिंचवड शहर तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील रूग्णांनी सहभाग नोंदविला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी या शिबीराच्या माध्यमातून गोरगरीबांना आजारांची मोफत तपासणी व उपचार करून दिल्याबद्दल रूग्णांनी मोठे समाधान व्यक्त केले.