सहा लाखांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

0
182

संत तुकारामनगर, दि. २३ (पीसीबी) – वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीमधील क्रमांकावर कर्ज मिळण्यासाठी संपर्क केला असता फोनवरील व्यक्तीने सहा लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळी करणे सांगून फोनवरील व्यक्तीने २३ हजार रुपये घेत पुन्हा पैशांची मागणी करून फसवणूक केली. ही घटना 30 सप्टेंबर ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

विनायक नंदकुमार गोसावी (वय 53, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक बात्रा नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वर्तमानपत्रात आलेली जाहिरात वाचून फिर्यादींनी त्यातील क्रमांकावर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, बँक स्टेटमेंटची मागणी केली. सहा लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून प्रोसेसिंग फी, तीन महिन्याचे ऍडव्हान्स हप्ते अशा कारणांसाठी 23 हजार 200 रुपये फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागात कर्ज अडकले असल्याचे सांगून कर्ज रकमेच्या पाच टक्के 30 हजार रुपयांचीमागणी केली. फिर्यादींनी ही रक्कम देण्यासाठी नकार देऊन कर्ज नको असल्याचे सांगितले. भरलेले पैसे परत मागितले असता आरोपीने ते पैसे परत न देता तसेच कर्ज मंजूर करून न देता फिर्यादीची फसवणूक केली. याबाबत फिर्यादींनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.