सरकारवर टीका केल्यामुळे अमोल पालेकरांचे भाषण रोखले

0
905

मुंबई, दि. १० (पीसीबी) – सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच रोखण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (दि.९) घडला. मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालेकर  उपस्थित होते.

पालेकरांनी आपल्या भाषणात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी  सांगितले. यावर मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी पालेकरांना भाषण मध्येच थांबवण्यास सांगितले.

तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे, असे त्यांना यावेळी सांगण्यात आले. अखेर अमोल पालेकरांनी  तुम्ही मला भाषण द्यायला बोलावले आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असेच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झाले होते, असे म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपते घ्यायला सांगितले.