“समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर पोलिसांकडे मागितला. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे का?”

0
442

मुंबई, दि.२६ (पीसीबी) : समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा सीडीआर पोलिसांकडे मागितला. सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला आहे. आम्ही कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या अधिकाराचा भंग केला नाही. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही घाला घालत नाही. माझ्या जावयाला बंद केलं गेलं. कोर्टात प्रकरण आहे. माझी मुलगी अनेक कागदपत्रं काढण्याचा प्रयत्न करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला. माझी मुलगी निलोफर मलिक काय गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे.? असा सवाल करतानाच वानखेडे आपल्या मर्यादेचा भंग करत आहेत, असं मलिक म्हणाले.

गुन्हेगाराचा सीडीआर हवा असेल तर तो मागा. तुमचा अधिकार आहे. हिंमत असेल तर माझ्या मुलीचा सीडीआर मागाच. त्यातही कायदेशीर लढाई आम्ही लढू. समीर वानखेडे दोन लोकांचे फोन टेप करत आहेत. लोकांच्या फोनला इंटरसेप्ट करत आहे. दोन प्रायव्हेट लोक आहेत. एक व्यक्ती मुंबईत आहे. दुसरा व्यक्ती ठाण्यात आहे. आज नाही तर उद्याही या शहरात वानखेडे लोकांचे कशापद्धतीने फोन टॅपिंग करत आहेत हे सुद्धा लोकांसमोर ठेवलं जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी सीडीआर देण्यास नकार दिला. तिच्या खासगी आयुष्याची माहिती देऊ शकत नाही असं पोलिसांनी सांगितलं. माझ्या माहितीनुसार या शहरात दोन प्रायाव्हेट व्यक्तींच्या माध्यमातून फोन इंटरसेप्ट करत आहेत. त्या दोन व्यक्तींचे नावे आणि पत्ते माझ्याकडे आहेत. ही लढाई अजून दीर्घ चालेल, असं ते म्हणाले.