समान नागरी कायद्यासाठी वकिल नितीन कासलीवाल यांची पुणे ते दिल्ली पायी वारी

0
174

पुणे, दि. १७ (पीसीबी) – समान नागरी कायदा देशभर लागू करावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ वकिल नितीन कासलीवाल हे येत्या १४ एप्रिल पासून पुणे ते दिल्ली पायी चालत संसद भवनात जाणार आहेत. यापूर्वी मुद्रांक खात्यातील भ्रष्टाचार संपविण्याच्या मागणीसाठी कासलीवाल यांनी पुणे ते मुंबई मंत्रालय अशी पायी वारी केली होती.

वकिल नितीन कासलीवाल हे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रथितयश कायदेज्ञ आहेत. आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना ते म्हणतात, जन्मापासूनच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मर्जीप्रमाणे विभिन्न संस्कार मिळतात. धर्माचरणा नुसार कोणताही एक किंवा दोन किंवा अनेक धर्म स्वीका.रण्याची किंवा नाकारण्याची मुक्तता प्रत्येकाला मिळायला पाहिजे. त्यासाठी पूर्ण मानवता आधारित समान नागरी कायदा (Uniform Civil Code) सर्व भारतभर असायला पाहिजे. जन्मापासूनच समानता नाकारणारे व विभगणी करणारे सर्वच व्यक्तिगत कायदे (personal law) रद्द केले पाहिजेत, अशी आपली आग्रही मागणी आहे. त्यासाठी 14 एप्रिल 2023 पासून पुणे ते दिल्ली पायी चालत जाणार आहे.

नितीन कासलीवाल यांनी एप्रिल २०२२ पासुन पंतप्रधान व अन्य संबंधित मंत्री, अधिकारी यांना नोटीस पाठवुन समान नागरी कायदा किती आवश्यक आहे याबाबत पत्रव्यवहार केला. मानवतेवर आधारित दिशादर्शक या कायद्यासाठीचा मसुदासुध्दा कासलीवाल यांनी शासनाला पाठविला आणि वारंवार पाठपुरावा केला. परंतू तरीसुद्धा मानवते विरुद्ध तसेच भारतीय घटनेचे preamble व कलम १४, १५ चे विरुद्ध असणारे व कलम १३ प्रमाणे गैर लागू (void) असणारे व्यक्तिगत कायदे गेली अनेक वर्षे सर्व भारतभर थोपले जात आहेत. जाणूनबुजून गेली ७० वर्ष पेक्षा ही जास्त कालावधी कलम ४४ ला अपेक्षीत मानवता आधारीत समान नागरी कायदा आणण्यासाठी संसद व सर्व संबंधित चालढकल करीत असल्याने हा निर्णय घेतल्याचे नितीन कासलीवाला सांगतात.

कासलीवाल यांचे असे म्हणणे आहे की घटनेचे कलम २५ मध्ये सांगितलेली व अभिप्रेत असलेले सद्सदविवेकबुध्दीचे स्वातंत्र्य आणि (संस्कार) धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण प्रसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कलम १४ व १५ यांचे अधीन राहून, तसेच गर्भ, टेस्ट ट्यूब, प्रयोग शाळा, गाव, प्रांत, भाग, क्षेत्र याचे सहित कोणतेही जन्माचे स्थान याबद्दल भेदभाव न करता असलेले स्वातंत्र्य व मुक्तता आहे. परंतु सध्या लागू असलेले विविध व्यक्तिगत कायदे , प्रत्येक व्यक्तीला, जन्मापासूनच या स्वातंत्र्य व मुक्तता या पासून दुरावत आहे, वेगवेगळे करत आहे. त्याला खऱ्या अर्थाने निवडण्याचे व वागण्याचं, निवड बदलण्याचा, विविध संस्कार धर्म एकत्रित स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा, अपेक्षीत असलेले स्वातंत्र्य व मुक्तता या सर्व व्यक्तिगत कायदे व त्यास अनुसरून असलेले विचार यांनी हिरावुन घेतले आहे. यासंदर्भात सरकार तोंड उघडायला तयार नाही.

पायाचा व शरीराचा त्रास असलेल्या ॲडवोकेट नितीन कासलीवाल यांनी वेटलिफ्टर व जिम चे कोच असलेले संतोष मर्डेकर यांचेकडून रोज साधरण ४५ ते ७० किलोमीटर चालण्यासाठी आवश्यक ट्रेनिंगसुध्दा सुरू केले आहे. ज्यांना नितीन कासलीवाल यांचे विचार व प्रयोजन योग्य वाटते, त्यांनी या प्रवासात साथ दिल्यास किंवा काही काळ साथ द्यायची असेल तर त्यांचेही स्वागत आहे, असे कासलीवाल यांनी जाहीर केले आहे.